Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी

लवकरच लोकार्पण होऊ घातलेल्या पनवेल सार्वजनिक उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेला आता अंतिम स्वरुप देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार 54 कायम पदे व 57 कंत्राटी पदे भरण्याचा विनंती प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक धोरणानुसार तत्वत: मान्य करण्यात आला आहे. पनवेल येथील सार्वजनिक उपजिल्हा रूग्णालय तातडीने सुरू होण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 19) विधान भवनात आढावा बैठक झाली.

पनवेल उपजिल्हा सार्वजनिक रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून बैठकीत 54 कायम पदे व 57 कंत्राटी पदे भरण्याचा विनंती प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विषयक धोरणानुसार तत्वत: मान्य करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोग्य मंत्र्यांनी सदरची पदे तात्काळ भरण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पूर्णवेळ, नियमित, कौशल्यपूर्ण सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी पनवेल सार्वजनिक रूग्णालयाला उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना मांडली. तसेच सदरच्या रूग्णालयात अत्यावश्यक सेवा कक्ष (आयसीयू) 20 खाटांचा असावा व डायलिसिस सेंटरसुध्दा असावे, अशी मागणी केली. तसेच या मागणीचा पाठपुरावाही केला होता. ही मागणी आरोग्य मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मान्य केली असून आवश्यकता भासल्यास सिडको व जिल्हा नियोजन मंडळ यामधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. रुग्णांच्या सेवेसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरात लवकर लोकार्पण झाले पाहिजे, यासाठी सर्व सूचनांची अंमलबजावणी युध्द पातळीवर करण्याचे आदेश आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे अंदाजे एक महिन्याच्या कालावधीत पनवेल सार्वजनिक रूग्णालय नागरिकांसाठी खुले होईल.

या बैठकीला आरोग्य खात्याचे उपसचिव मनोहर ठोंबरे, सहसंचालक श्री. पवार, उपसंचालक डॉ. गौरी राठोड, रायगडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply