Breaking News

निवडणुकांपूर्वी सिडकोच्या घरांसाठी अर्जविक्री

नवी मुंवई : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडकोच्या 90 हजार घरांसाठी अर्ज विक्री सुरू करण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. त्यामुळे मागील सोडतीत संधी हुकलेल्या ग्राहकांना घरासाठी पुन्हा एकदा नशीब आजमावता येणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरांसाठी प्रत्यक्ष अर्ज विक्री सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.सिडकोने गेल्या वर्षी 15 हजार घरांची योजना जाहीर केली. अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या गृहप्रकल्पातील घरांसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभरातून सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोने आणखी 89 हजार 771 घरांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांशी घरे सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून उभारली जाणार आहेत. एकूण घरांपैकी 35 टक्के घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव असणार आहेत. यातील सर्वाधिक घरे दक्षिण नवी मुंबईत असणार आहेत. या गृहयोजनेच्या माध्यमातून बांधकाम सुरू असतानाच घरांची विक्री ही नवीन संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या गृहप्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा 5 जुलै रोजी उघडण्यात येणार होत्या; परंतु केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळ परिघातील इमारतींच्या उंचीची मर्यादा काहीशी शिथिल केल्याने प्रस्तावित केलेल्या 90 हजार घरांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे निविदाधारकांना आणखी वेळ देण्यात आला आहे. परिणामी या महिन्याच्या अखेरीस प्राप्त निविदा उघडून महागृहनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील कंत्राटदारांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply