Breaking News

शेतकर्यांसाठी खूषखबर!

पीकविमा अर्ज भरण्यास सरकारकडून मुदतवाढ

मुंबई ः प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी पीक विमा अर्ज दाखल करण्याची मुदत 24 जुलैपर्यंत देण्यात आली होती, मात्र अर्ज करताना शेतकर्‍यांना येणार्‍या तांत्रिक अडचणी लक्षात घेता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढून ही वाढ करण्याचे आल्याचे पत्र संबंधित अधिकार्‍यांना दिले आहे. त्यानुसार 25 जुलै ते 29 जुलै अशी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला पीक विमा अर्ज दाखल करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सरकारतर्फे करण्यात आले आहे. तसेच संबंधित विमा कंपन्यांना याबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या अवर सचिव नीता शिंदे यांनी राज्यपाल यांच्या आदेशान्वये हे परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान, पीक विम्याचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने शेतकरी पीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेंचे उंबरठे झिजवत आहेत. पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकला होता. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळेच पीक विमा भरण्यासाठी मुतदवाढ मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. राज्य सरकारने याची दखल घेत पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. जुलै महिना संपत आला असला तरी पश्चिम विदर्भात अद्याप पावसाचा पत्ता नाही. सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली ती कायम आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भवासीयांचे पीक संकटात आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने शेतकर्‍यांना सातबारा, नमुना आठ, स्वयंघोषित पत्रक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स स्कॅन करून ऑनलाइन विमा काढावा लागतो.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply