सभागृह नेते परेश ठाकूर यांचे अधिकार्यांना निर्देश
पनवेल : प्रतिनिधी
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाला मंगळवारी (दि. 30) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी नाट्यगृहाची पाहणी करून आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले.
या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मनोहर म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, नाट्यगृहाचे व्यवस्थापक कोळी आणि नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
नाट्यगृहातील अग्निशमन यंत्रणेतील अग्निरोधक उपकरणाची मुदत वर्षापूर्वीच संपलेली असल्याने नाट्यरसिकांची सुरक्षा वार्यावर सोडलेली पाहून सभागृह नेते परेश ठाकूर यांना धक्का बसला. त्यांनी अग्निरोधक उपकरणाचे तातडीने रिफिलिंग करण्याचे आदेश व्यवस्थापकांना दिले.
नाट्यगृहाच्या प्रेक्षागृहातील फाटक्या खुर्च्या, कलाकारांच्या मेकअप रूममधील शौचालयातील अस्वच्छता याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय रंगमंचावरील साऊंड सिस्टीमसाठी बॉस कंपनीकडून 70 लाख रुपयांना खरेदी केलेली सिस्टिम कंपनीने सुरू करून दिलेली नाही. त्यामुळे ती धूळ खात पडली आहे. महावितरण कंपनी व्यापारी दराने नाट्यगृहाचे बिल आकारत असल्याने ते जास्त येते. अनेकदा सामाजिक संस्थांना कमी दराने नाट्यगृह दिले जाते. परिणामी नाट्यगृहाचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. याबाबत करावयाच्या उपाययोजना आणि नाट्यगृहातील दुरुस्तीबाबत परेश ठाकूर यांनी अधिकार्यांना निर्देश दिले.