वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून अभीष्टचिंतन
पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे आणि पनवेलचा चेहरामोहरा विकासात बदलणारे सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) अनेक मान्यवर मंडळींसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री रविशेठ पाटील, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर मंडळींनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त दूरध्वनीद्वारे अभीष्टचिंतन केले, तर राज्यमंत्री तथा रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते महेंद्र घरत, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, राजेंद्र पाटील, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, युवा नेते वैकुंठ पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील गणेश मंदिरात श्रीगणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. पिताश्री रामशेठ ठाकूर व मातोश्री शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी हितचिंतकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवत समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. आमदारकीबरोबरच भाजप जिल्हाध्यक्ष, सिडको अध्यक्ष यासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पदे ते भूषवत आहेत, परंतु कितीही मोठा झालो, तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, हीच समाजहिताची भूमिका त्यांनी जोपासली. त्यामुळे खर्या अर्थाने कर्तृत्वाने ते मोठे झाले. ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ अशी ख्याती त्यांची राज्यात निर्माण झाली आहे. कर्तृत्वाने आपल्या कार्याचा ठसा सर्वत्र उमटविला असतानाही त्यांनी त्याचा कधीही गर्व केला नाही. ते
स्वतःला सामान्य कार्यकर्ताच समजतात. म्हणूनच त्यांच्या पाठीशी सर्व समाजातील लोक खंबीरपणे उभे आहेत. त्याची सोमवारी पुन्हा प्रचिती आली ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या गर्दीने. त्यांचा यंदाचा 45वा वाढदिवस खर्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा वाढदिवस म्हणूनच साजरा झाला.
मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद
वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ किंवा बॅनर नको. शक्य झाल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीस किंवा पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णालय समितीस आर्थिक मदत करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला कार्यकर्ते, हितचिंतकांनी भरघोस प्रतिसाद दिला.