टोकियो : वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी (दि. 21) न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली.
कर्णधार हरमनप्रीत सिंग (7 मिनिटे), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा (22 मि.), गुरसाहीबजीत सिंग (26 मि.) आणि मनदीप सिंग (27 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
दोन्ही संघांनी मैदानाच्या मध्यरेषेवरच अधिक खेळ करण्यावर भर दिला. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयशी ठरले. नंतर कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडकडून पलटवार झाला, परंतु भारताची बचावफळीही तितकीच तगडी होती.
शमशेरने 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताची आघाडी 2-0ने मजबूत केली. दुसर्या सत्रात ‘किवीं’च्या खेळाडूंना केवळ दोनदाच भारताच्या वर्तुळात प्रवेश करता आला. 22व्या मिनिटाला गुरसाहीबजीत आणि मनदीपच्या पासवर निलकांताने गोल केला. यानंतर गुरसाहीबजीत आणि मनदीप यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
या विजयानंतर भारताचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीकडे लागले आहे. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत पात्रता स्पर्धा होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper