Breaking News

चिदंबरम यांचा भ्रष्टाचार आणि हिंदू आतंकवाद

काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राजकीय स्फोट झालेला नाही. महाराष्ट्राची पूरपरिस्थिती हळूहळू सावरत आहे. भूतपूर्व केंद्रीय वित्त आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी चालू आहे. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी गेलो की त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी येतो हे समजते.आपल्याकडे राष्ट्रवादावर शास्त्रीय पद्धतीने गंभीर चर्चा न करण्याची बौद्धिक शिस्त आहे. त्यामुळे देशाची प्रेरणा हरवली आणि प्रेरणालोप ही सगळ्यात मोठी हानी असते. बौद्धिक भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा आणि प्राणघातक भ्रष्टाचार असतो. आपल्या या प्राचीन, विशाल आणि नयनमनोहर देशाचा राष्ट्रवाद कोणता याविषयी राज्यकर्त्या धूर्त ब्रिटिशांनी आमच्या मनात संशय निर्माण केला. तो प्रश्न आम्ही अजून सोडविलेला नाही. ज्यांचा राष्ट्रवाद निश्चित ठरलेला नसतो ते अधांतरी लोंबकळत असतात. जेथे काही स्थिर नसते ती धर्मशाळा असते. घराशी जे सख्य असते ते धर्मशाळेशी निर्माण होणे कठीण असते. तेथे सगळे

एकमेकांचे काही तासांचेच सोबती असतात. म्हणून तेथे भामट्यांच्या उचलेगिरीला अधिक वाव असतो.

चिदंबरम यांना वित्तमंत्री असताना देशाची म्हणजे गोरगरिबांची आर्थिक उन्नती करण्याऐवजी आपल्या मुलाची धन करावी असे का वाटले? कारण ते अशा वर्तमानकाळात जगत होते की देशाच्या भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. हिंदू हे बहुसंख्याक असूनही आणि आदिम काळापासून जननीस्वरूपात या देशाची अनन्यभावाने त्यांनी भक्ती केली असूनही चिदंबरम यांना त्यांचे क्षुद्र राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी हिंदू म्हणजे खेळणे वाटले. सर्व मुसलमान आतंकवादी नसतात, पण जे आतंकवादी सापडतात त्यातले पुष्कळ मुसलमान असतात. हे राजकीय वास्तव लपविणे हाच काँग्रेसचा सुरुवातीपासून आजपर्यंत मुख्य व्यवहार राहिला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही काँग्रेसचे मुख्य ध्येय राहिले आहे. अशी ध्येये सहजासहजी साध्य होत नाहीत.  त्यासाठी आईची माया आणि बापाचे कठोर अनुशासन असलेले नेते हवे असतात. यासमयी प्रामुख्याने जर्मनीचा बिस्मार्क आणि तुर्कस्थानचा अतातुर्क केमालपाशा यांची आठवण येते. ते नेते नव्हते तर राष्ट्रनिर्माते होते. इटलीपासून अमेरिकेपर्यंत अनेक लहानमोठ्या राष्ट्रांना राष्ट्रनिर्माते मिळाले. राष्ट्रीय एकात्मता मुळातून घट्टपणे बांधत कशी आणायची आणि त्याचा अतूट असा गोफ कसा विणायचा याचे आदर्श त्यांनी उभे केले. भारताला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुढारी मिळाले. दुर्दैवाने त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण करता आले नाही. मुसलमान समाज हा नेहमी राज्यकर्त्याच्या भूमिकेत म्हणून उग्र राहिला. त्याला नागरिकत्वाच्या भूमिकेत आणणे ही राष्ट्रबांधणीची प्राथमिक आवश्यकता होती. त्यासाठी विचारवंतांच्या पातळीवर मुसलमानांच्या मानसिकतेचा अभ्यास होणे आवश्यक होते. इस्लामने मुसलमानांची मानसिकता पूर्णपणे व्यावर्तक, असहिष्णू आणि सहजीवनास अयोग्य अशी केली आहे. इथे आईच्या मायेने मुसलमानांना काही काळापूर्वी ते हिंदू होते म्हणून दोघांचे पूर्वज समान आहेत याची स्पष्ट जाणीव करून द्यायला हवी होती. म्हणजे प्रभू रामचंद्राविषयी आज त्यांच्या मनात दूरत्वाची किंवा काही वेळा शत्रुत्वाची भावना नांदत असते तसे झाले नसते. बापाच्या कठोर अनुशासनाचा उपयोग करायचा तर मुसलमानांना हे

निःसंदिग्धपणे सांगितले गेले पाहिजे होते की त्यांच्या धर्मात मूर्तिपूजा निषिद्ध असली तरी अन्य धर्मीयांच्या मूर्तींची तोडफोड करण्याचा त्यांना अधिकार नाही. तो दंडनीय अपराध आहे. संपूर्ण भारतीय समाजाचे आम्ही पालक आहोत असा दावा ज्यांनी केला त्यांनी गेल्या शंभर वर्षांत मुसलमानांना उत्तम नागरिक बनविण्याच्या दृष्टीने वरीलपैकी काहीच केले नाही.

हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही काहीतरी ठोस करतो आहोत हे तर त्यांना दाखवायचे होते. म्हणून त्यांनी जे जन्मतःच सहिष्णू आणि उदारमतवादी होते त्या हिंदूंनी ते अधिक सहिष्णू  आणि  अधिक उदारमतवादी झाले तर मुसलमानांना त्यांच्याविषयी विश्वास वाटेल आणि ऐक्य साधता येईल असा नवा सिद्धांत काँग्रेस संस्कृतीने प्रस्थापित करण्याचा विडा उचलला. परिणामी हिंदू अधिक दुबळे झाले आणि अशा अवस्थेत माणूस जसा दैववादी होतो तसे हिंदू काँग्रेसवादी  झाले. या मानसिक स्थित्यंतराचे पुरेपूर शोषण काँग्रेसने केले. पाप-पुण्याच्या विषयात हिंदू आणि मुसलमान समसमान आहेत आणि कोणी कोणाला कमी-जास्त लेखण्याचा प्रश्न येत नाही हा काँग्रेसचा आणखी एक अत्यंत आवडता सिद्धांत आहे. त्यातून हिंदू आतंकवाद हा शब्दप्रयोग जन्माला आला. या शब्दप्रयोगाचा प्रसार करण्यात जसे सुशीलकुमार शिंदे आघाडीवर होते तसे पी. चिदंबरमही मागे नव्हते. त्यातून त्यांनी काही कथानके रचली आणि अभियोग उभे केले. असे हे चिदंबरम जे मुसलमानांना बरे वाटावे म्हणून हिंदूंना आतंकवादी ठरविण्यासाठी लुंगी खोचून पुढे सरसावले. ते वित्तमंत्री असताना आर्थिक घोटाळे करणार नाहीत असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. अर्थात सध्या त्यांच्यावर केवळ आरोप ठेवले गेले आहेत. त्यांना न्याय मिळावा अशीच सर्व सज्जनांची इच्छा असणार. राष्ट्रवाद निश्चित झाला आणि अंगात भिनला की माणसावर त्याचे नैतिक दडपण असते आणि तेवढ्या प्रमाणात त्याच्या हातून देशाचे अनहित कमी होते असे म्हटले जाते. तेवढ्यापुरता चिदंबरम आणि राष्ट्रवादाचा अभाव असा संबंध जोडला.

धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा काश्मीर विषयात कसा चुकीचा मांडला जातो ते पाहू. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे जगाला दाखविण्यासाठी काश्मीरचे अनुच्छेद 370 आणि तशाच वारेमाप सवलती देऊन लाड करण्यात आले आणि त्यात काही बिघडले नाही असे काही राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. कारण काश्मीर हे भारतातील एकमेव मुस्लिमबहुल राज्य आहे. मुस्लिम बहुलता आणि धर्मनिरपेक्षता या दोन मुद्द्यांचा स्वतंत्रपणे समाचार घेऊ. काश्मीरवर पांडवांनी राज्य केले आहे. केवळ इसवी सन 1300 ते 1800 ही पाचशे वर्षे तेथील राज्यकर्ते इस्लाम धर्मीय होते. हिंदूंच्या राजकीय उदासीनतेमुळे इस्लामला हातपाय पसरण्याची संधी मिळाली. म्हणून ही वस्तुस्थिती लपत नाही की काश्मीर हे फार प्राचीन काळापासून हिंदूबहुलच राहिले आहे. धर्मनिरपक्षतेच्या संदर्भात सांगायचे तर भारतात मुसलमान नव्हते तेव्हाही भारत धर्मनिरपेक्षच राहिला आहे. हिंदू धर्मात शैव, वैष्णव इत्यादी इतके नाना पंथ आहेत की कोणत्याही एका पंथाला इतरांपेक्षा अधिक महत्त्व देण्याचे धोरण हिंदू राज्यकर्त्यांनी कधी अवलंबिले नाही. हिंदू सम्राटांनी धार्मिक पंथोपंथात कधी राजकीय हस्तक्षेप केला नाही. सगळ्यांना उपासना स्वातंत्र्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. इतिहासकार आळतेकरांनी  पहिल्या  शतकापासून हिंदू राज्यकर्ते धर्मनिरपेक्ष पद्धतीने राज्यकारभार करीत होते असे पुरावे मिळतात, असे लिहून ठेवले आहे.

अनुच्छेद 370 काढून काश्मीरमध्ये मुसलमानेतरांनाही बिर्‍हाड ठोकण्याचा अधिकार  दिला जातो आणि आसाममध्ये नागरिकांची काटेकोरपणे अधिकृत नोंदणी केली जाते आणि जे नागरिक असणार नाहीत त्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेरही काढले जाते याकडे राष्ट्रीय विसंगती म्हणून काही टीकाकारांनी लक्ष  वेधले आहे. यातली गंमत अशी आहे की आसाममध्ये जे नागरिक नाहीत ते बांगलादेशी घुसखोर मुसलमान आहेत. मुसलमान जेव्हा संख्येने ठरावीक प्रमाणाहून अधिक होतात तेव्हा ते आझादीची म्हणजे फुटून निघण्याची मागणी करतात. त्यांना भूमीसकट विभाजन हवे असते. काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या वाढली तरी ते फुटून निघणार नाहीत आणि  त्यांचा सहनिवासी मुसलमानांना काही उपद्रवही होणार नाही. राष्ट्रीय हित  आणि अनहित ह्यांचा विचार न करता हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विचार करण्याची पद्धत आपल्याकडे काँग्रेसने पाडली आहे. त्यातून न सुटणारे वैचारिक आणि व्यावहारिक गोंधळ निर्माण झाले आहेत.

इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हा ते भ्रष्टाचार करीत नव्हते असे नाही. तो प्रमाणाबाहेर जात नसे आणि इंग्लंडची म्हणून जी प्रतिष्ठा आहे तिला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जात असे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा शिवाजी महाराजांना आदर्श मानण्यात गुंतलेली आहे. त्याचा विसर पडतो तेव्हा पैसे खाण्याचा मोह राज्यकर्त्यांना होतो. त्यातून संकटे निर्माण होतात. मुंबईत रंगभवनमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या उपस्थितीत बेंद्य्रांच्या संभाजी महाराजांवरील पुस्तकाचे प्रकाशन झाले तेव्हा इतिहासकार न. र. फाटक म्हणाले होते की, महाराष्ट्रात शिवाजीराजांच्या लढायांची वर्णने केली जातात, पण त्यांनी राज्यकारभार कसा चांगला केला ते तेवढे काळजीने सांगितले जात नाही. कारण ते सध्याच्या राज्यकर्त्यांना गैरसोयीचे असते. फाटक जे बोलले त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे, असो. -अरविंद विठ्ठल कुळकर्णी (मो. क्र. 9619436244)

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply