उरण ः रामप्रहर वृत्त
उरणमधील कोप्रोली गावातील अश्विनी अजित पाटील या नवदुर्गेने पतीच्या निधनानंतर न डगमगता स्वकर्तृत्वाने उभारी घेतली आहे. पतीच्या निधनानंतरही या महिलेने जिद्द कायम ठेवत मेहनतीवर विश्वास ठेवला आहे. यामुळे ही महिला उरण तालुक्यातील मेहनत करणार्यांसाठी आशेचे उदाहरण बनली आहे.
अश्विनी अजित पाटील यांचा दिवस पहाटे 3 वाजता सुरू होतो. पहाटे टेम्पो सुरू करूनच प्रवास सुरू होतो, तो वाशी नवी मुंबईच्या दिशेने. स्वतः टेम्पो चालवत वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन फळांची खरेदी करतात. ही खरेदी करताना फळांचा दर्जा आणि भावामधील तोलमोल याकडे जास्त लक्ष दिलं जात. उरणच्या कोप्रोली गावातील अश्विनी पाटील यांनी फळ विक्रीचा व्यवसाय 10 वर्षांपूर्वी त्यांचे पती अजित पाटील यांच्यासोबत सुरू केला होता, मात्र काही वर्षातच अजित पाटील यांना आजाराने ग्रासले. यातच त्यांचा मृत्यू झाला, मात्र अश्विनी पाटील यांनी न डगमगता कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता आपला व्यवसाय सुरू ठेवला. मेहनत करीत असताना त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले असून, त्या आदर्श पत्नीबरोबरच आदर्श माताही
बनल्या. आपली आई खूप मेहनत करत असून, तिने आजवर केलेली मेहनत आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. इतर महिलांनीही अशाप्रकारे मेहनत करून, स्वतःचा व्यवसाय करून आपल्या पायावर उभे राहावे, असे मत अश्विनी पाटील यांचा मुलगा अक्षय पाटील याने व्यक्त केले. वाशी एपीएमसीफ्रूट मार्केटमध्ये पहाटेच्या अंधारात जाऊन खरेदी करून, त्या फळांची विक्री करणे ही सोपी गोष्ट नसली, तरी हे काम अगदी सोपं करण्याचे काम अश्विनी पाटील यांनी केले आहे. अश्विनी पाटील या कमी शिकलेल्या असूनही हे सगळे सहजपणे जुळवून आणतात.
– आदर्श घ्या
अश्विनी पाटील यांची जिद्ध आणि चिकाटी पाहून इतर महिलांनीही पुढे येऊन व्यवसाय करत आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे, पुरुषाला साथ देणं बाईचे काम आहे. त्यामुळे शिक्षण नसले तरी चालेल, मात्र आपल्या कामावर विश्वास ठेवून महिलांनी काम करून स्वतःच्या पायावर उभे राहुन नवर्याला साथ द्यावी, अशी अपेक्षा या वेळी अश्विनी यांनी व्यक्त करत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश दिला आहे. अश्विनी यांच्यापासून तरुणींनी आदर्श घ्यायला हवा.
RamPrahar – The Panvel Daily Paper