Breaking News

सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये पराभव

फुजहोऊ (चीन) : वृत्तसंस्था

भारताच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील उपांत्य सामन्यात इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी मार्कस गिदोन आणि केव्हिन सुकामुल्जो यांनी पराभव केला. सात्त्विक-चिराग या बिगरमानांकित जोडीचा संघर्ष अपुरा पडल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

फुजहोऊ येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरवर रंगलेल्या उपांत्य सामन्यात मार्कस-केव्हिन यांनी सात्त्विक-चिराग यांना 21-16, 22-20 असे दोन गेममध्ये पराभूत केले. हा सामना 41 मिनिटे रंगला.  जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणार्‍या सात्त्विक-चिराग यांनी उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या तिसर्‍या मानांकित ली जून हुई आणि लिऊ यू चेन यांना 21-19, 21-15 अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली होती. त्यामुळे या सामन्यातही त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा होती.

सात्त्विक-चिराग मार्कस-केव्हिनपुढे पहिल्या गेममध्ये निष्प्रभ ठरले. इंडोनेशियाच्या जोडीने मध्यंतराला 11-9 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर सात्त्विकने काही दमदार स्मॅशेस लगावताना एकवेळ मार्कस-केव्हिन यांची आघाडी 15-14 अशी कमी केली होती, परंतु त्यानंतर पुन्हा क्षुल्लक चुका केल्यामुळे त्यांनी पहिला गेम 16-21 असा गमावला.

दुसर्‍या गेममध्ये सात्त्विक-चिरागने झोकात पुनरागमन करताना मार्कस-केव्हिन यांना एकेका गुणासाठी संघर्ष करायला लावला. 17-15 अशी आघाडी असताना सात्त्विक-चिराग यांनी सलग तीन गुण गमावले. मार्कस-केव्हिन यांनी नेटजवळून फटक्यांचा आणि दीर्घ रॅलीजवर भर दिला. त्यामुळे सात्त्विक-चिराग दडपणाखाली आले. मार्कस-केव्हिनने सलग दोन गुण मिळवले. मार्कसनेच कोर्टलगत स्मॅशचा फटका लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply