Breaking News

वनवासी कल्याण आश्रमातील मुलांची अनोखी सफर

कर्जत : प्रतिनिधी

येथील रोटरी क्लबने बालदिनाचे औचित्य साधून जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहतील मुलांसाठी कर्जतजवळील वसंत हॉलिडेज फार्म हाऊस येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मुलांसह रोटरीचे सर्व सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिनेमा, स्विमिंग पूलचा आनंद, लज्जतदार जेवण आणि बरंच काही… जणू स्वप्नातल्याच या रंगीबेरंगी दुनियेची अनोखी सफर त्यांनी अनुभवली. रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या पुढाकाराने जांभिवली विद्यार्थी वसतिगृहातील मुलांना ही अनोखी सफर घडविण्यात आली. यात येथील अनुभव ऐकताना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. शिवाय तिथे असलेल्या स्विमिंग पुलातील पाण्यात मजा करताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. येथील गमतीदार खेळ खेळताना तर मुलांना धमालच आली. या मुलांसह प्रत्येक खेळात रोटरीचे सदस्य सहभागी झाले होते. हॉटेलच्या वतीने दिलेल्या लज्जतदार जेवणावर तर सर्व मुले खूश झाली. या वेळी मुलांना दाखविण्यात आलेला ‘हिरकणी’ हा चित्रपट तर त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देऊन गेला. रोटरी क्लब अध्यक्ष हुसैन जमाली, सचिव जितेंद्र ओसवाल, सुनील सोनी, माधव भडसावळे, सूर्याजी ठाणगे, अशोक ओसवाल, मुफद्दल डाभिया, जितेंद्र परमार, विशाल शहा, डॉ. स्वप्नील पडते, वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार, अधीक्षक विनेश नवेज या वेळी उपस्थित होते.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply