Tuesday , March 21 2023
Breaking News

धडाकेबाज कोहलीचे ‘विराट’ विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

तिसर्‍या वन-डे सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. दोन्ही सलामीवीरांचे अपयश आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून सतत होणारी निराशा ही भारतीय संघासाठी आगामी काळात चिंतेची गोष्ट ठरणार आहे, मात्र कर्णधार विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म या सामन्यातही कायम राहिला आहे. नागपूरच्या सामन्यात शतकी खेळीने संघाचा डाव सावरणार्‍या कोहलीने रांचीच्या मैदानातही शतक ठोकले. या शतकी खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रमांची नोंद केली आहे.

केदार जाधवसोबत कोहलीने महत्त्वाची भागीदारीही केली. ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच झॅम्पाने कोहलीचा त्रिफळा उडवत भारताच्या आशेवर पाणी फिरवले. भारतावर 32 धावांनी मात करीत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपले आव्हान कायम राखले, पण विराटने मने जिंकली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत त्याने 95 चेंडूंत 123 धावा केल्या. या खेळीत 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

या शतकासह कोहलीने व्यावसायिक क्रिकेटमधील 29 हजार धावांचा टप्पा गाठला. कोहलीने एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून इतक्या धावा केल्या आहेत.

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना विराटचे हे 25वे शतक ठरले. 300पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना विराटचे हे नववे शतक ठरले. या यादीमध्ये कोणताही फलंदाज सध्या त्याच्या जवळ नाही. माजी श्रीलंकन खेळाडू कुमार संगकारा आणि इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय यांच्या नावावर अशी चार शतके जमा आहेत. विराटने फलंदाजीच्या सरासरीमध्येही आपले स्थान भक्कम केले आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षांत एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंनी मिळून 14 शतके ठोकली आहेत. बांगलादेशने 13, वेस्ट इंडिजने 12; तर श्रीलंका संघाने 10 शतके लगावली आहेत. याच काळात विराट कोहलीने एकट्याने 15 शतके केली आहेत. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्येही विराट धावांचा पाऊस पाडतोच आहे. 2017पासून विराटने एकदिवसीय, कसोटी व टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये 25 शतके ठोकली आहेत.

डिव्हीलियर्सला टाकले मागे

रांचीच्या मैदानावर विराटने कर्णधार या नात्याने वन-डे क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा विराट 12वा कर्णधार ठरला आहे. याच वेळी विराटने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हीलियर्सलाही मागे टाकले. डिव्हीलियर्सने 77 डावांमध्ये अशी कामगिरी केली होती; तर विराटने आपल्या 63व्या डावात हा पराक्रम केला आहे.

Check Also

आदिवासी रायगड प्रीमियर लीग रंगणार

कळंबोली : बातमीदार रायगडच्या विविध भागांत क्रिकेटचा फिवर वाढला आहे. जिल्ह्यात एकीकडे मोठ-मोठ्या स्पर्धा भरविल्या …

Leave a Reply