पेण : प्रतिनिधी
शरीर निरोगी राहावे यासाठी किमान एक तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदरतेबरोबरच स्वास्थ्यपूर्ण पेण ही संकल्पना अमलात आणण्यासाठी व याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून पेण नगर परिषदेने मॅरेथॉन आयोजित करून स्तुत्य उपक्रम राबविल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 2) येथे काढले. मिनी मॅरेथॉनच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
स्पर्धेस डॉ. सागर ओक, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती राजेश म्हात्रे, दर्शन बाफना, तेजस्विनी नेने, अश्विनी शहा, माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, नगरसेवक प्रशांत ओक, माजी नगरसेविका धनश्री समेळ, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, पेण नगर परिषद ही रायगड जिल्ह्यातील एकमेव पालिका असेल की जिने खेळाडूंना भव्य मैदान उपलब्ध करून दिले आहे. खेळाडूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे येथे आयोजन करण्यात येत असून, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण पालिका कात टाकत आहे. पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा देण्याबरोबरच त्यांंच्या स्वास्थ्याची जपणूक करण्याचे कामही होतंय हे आजच्या उपक्रमातून दिसून आले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे आमदार ठाकूर यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
जीवनात खेळ व व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे व त्यासाठी वेळ दिला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत, असे सांगून या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. डॉ. सागर ओक यांनीही जीवनातील खेळाचे महत्त्व विषद करून आपले स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी क्रीडा कौशल्य जपणे गरजेचे असल्याचे सांगितले.
विकासासाठी कटिबद्घ : नगराध्यक्ष आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत स्वच्छ, सुंदर पेण ही संकल्पना राबविताना स्वास्थ्यपूर्ण नगरी व्हायला पाहिजे यासाठी हा उपक्रम हाती घेतला. नागरी समस्या सोडवून विकासात्मक सोयीसुविधा पुरविण्याचे काम नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. शहरातील कचर्याचा प्रश्न घनकचरा प्रकल्प राबवून सोडविला. ओला, सुका कचरा वर्गीकरण करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे काम केले जात आहे. नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले.