माणगाव ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यासह कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला. चक्रीवादळामध्ये माणगावसह तालुक्यातील लहान मोठ्या शैक्षणिक संस्थांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच अनेकांच्या घरांची पडझड झाली. याशिवाय आंबा, काजू, सुपारी, नारळ बागायतदारांचेही कोकणात मोठे नुकसान झाले आहे.
माणगावसह तालुक्यातील लोकांना पावसाच्या तोंडावर निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकांच्या घरांची कौले, पत्रे उडाली. रस्त्यावर तसेच गावागावातून झाडे व वीजवाहिन्या तसेच विजेचे पोल तुटून पडले होते. विविध शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान होऊन पत्रेही उडाले, मात्र या शैक्षणिक संस्थांकडे अजूनही सत्ताधारी खासदार, मंत्री, आमदारांनी लक्ष न दिल्याने जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.