जागरूक नागरिकांची मागणी
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड शहरात डॉक्टर व पोलीस यांच्यानंतर आता डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुरूड शहरातील जागरूक नागरिक ललित जैन, समाजसेवक अरविंद गायकर, भावेश शहा, आशील ठाकूर, श्रीकांत सुर्वे, शुभांगी करडे, अभी सुभेदार आदींनी मुख्याधिकारी अमित पंडित यांची भेट घेतली आणि मुरूडची बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याची मागणी केली.
पेण व रोहा येथे कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन तेथील बाजारपेठा चार दिवस बंद ठेवून या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. त्याप्रमाणेच मुरूड शहरसुद्धा बंद ठेवून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
या वेळी ललित जैन म्हणाले की, सध्या मुरूड शहरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. ते पाहता नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी अशा लोकांवर कारवाई करावी, तर समाजसेवक अरविंद गायकर यांनी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे मुक्त फिरणे घातक असून, यावर सर्व दुकाने बंद करणे हाच एकमेव उपाय आहे, असे सांगितले.
श्रीकांत सुर्वे यांनी एकदरा व अन्य भागातील रस्ते बंद करा, असे सूचित करून मुरूड शहर बंद होण्यासाठी लोकप्रतिनिधींचे पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. आशील ठाकूर यांनी प्रशासनाने नियम कडक करावेत, अशी मागणी केली. शुभांगी करडे यांनी काही दुकानात प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात असून, त्यावर प्रतिबंध आणावा, असे म्हटले.
सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्याधिकारी अमित पंडित यांनी सांगितले की, आमचे सर्व कर्मचारी वादळाच्या पंचनामा प्रक्रियेत गुंतल्याने बाजारपेठेत लक्ष देता येत नाही. शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिकांना स्वतःच्या जीवाची पर्वा वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. जनतेने स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मागणीनुसार नगराध्यक्षांकडे चर्चा करून निर्णय कळवला जाईल. आपली भावना चांगली असून, याचा निश्चित सकारात्मक विचार केला जाईल, असेही मुख्याधिकार्यांनी शिष्टमंडळास आश्वसित केले.