खासगी रुग्णालयाने उकळले जादा बिल
नाशिक : प्रतिनिधी
कोरोनाच्या भीतीने नागरिक भीतीच्या छायेत वावरत असताना खासगी रुग्णालयाकडून उपचार शुल्काच्या नावाखाली वसुली सुरू असल्याचा प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला होता. या प्रकरणात महापालिकेने संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावल्यानंतर आता आणखी एका खासगी रुग्णालयात असाच प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या रुग्णालयाने 10 दिवस उपचार केले असताना 15 दिवसांच्या उपचाराचे पैसे वसूल केले. या प्रकरणाची दखल घेत नाशिक महापालिकेने नोटीस पाठवली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची लूट सुरू असताना राज्य सरकारने स्वस्त न बसता कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.
शासनाने कोरोना रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांना दर आकारणीबाबत दर निश्चित करून दिलेले आहेत. याबाबत वारंवार आवाहन करूनदेखील काही रुग्णालये याबाबत दक्षता घेत नसल्याचे प्राप्त तक्रारीवरून लक्षात आले आहे. या अनुषंगाने नाशिक महापालिकेच्या वतीने संबंधित हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देऊन त्याबाबतची बिलांची तपासणी केली जात आहे. या अनुषंगाने मनपाचे मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे रुग्णाने फोनवरून अशोका मार्ग येथील पायोनियर हॉस्पिटलमध्ये जादा बिलाची आकारणी केल्याबाबतची तक्रार केली होती. त्यात या हॉस्पिटलने या रुग्णाकडून एका पीपीई किटच्या किमतपोटी एका दिवसासाठी 10 हजार 500 रुपये इतके शुल्क आकारले आहे तसेच रुग्णावर 10 दिवस उपचार सुरू असताना कन्सल्टिंग चार्ज 15 दिवसाचे लावले आहेत.
याबाबत रुग्णाचे बिल व अनुषंगिक कागदपत्रे कार्यालयात सादर करण्याबाबत वेळोवेळी भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता, त्यांनी अद्याप याबाबतची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची व कायदा भंग करणारी असल्याने पायोनियर हॉस्पिटल, नाशिक यांना मुख्य लेखापरीक्षक बी. जे. सोनकांबळे यांनी मनपाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती सोनकांबळे यांनी दिली.
कोरोना रुग्णाकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा दर आकारणी केल्याबाबतच्या आलेल्या तक्रारीवरून शहरातील पायोनियर हॉस्पिटलला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, तर कोरोनाबळींची संख्याही वाढू लागली आहे. अशातच काही खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करताना दिसून येत आहे. अशांवर राज्य सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
नाशकात यापूर्वी दोन रुग्णालयांना नोटीस
नाशिकमध्ये असा प्रकार यापूर्वीही उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरा नगर येथील अशोका मेडिकव्हर व भाभा नगरमधील सह्याद्री अशा दोन रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळले जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर खासगी रुग्णालयातील देयकांची छाननी करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.