Breaking News

दुधाला वाढीव दर, भुकटीला अनुदान द्या!; भाजपचे आंदोलन

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

गायीच्या दुधाचा दर वाढवून मिळावा आणि दुधाच्या भुकटीला अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि. 20) एल्गार आंदोलन पुकारून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, तसेच मागणी मान्य न झाल्यास 1 ऑगस्टपासून दूध बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, बोगस बियाणे, युरियाचा तुटवडा व काळा बाजार, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशी अनेक संकटे शेतकरीवर्ग झेलत आहे. त्यात भर म्हणून गायीच्या दुधाला उचित भाव दिला जात नाही. हा भाव मिळवून देण्यासाठी एल्गार आंदोलनाची सुरुवात म्हणून भाजप, रयत क्रांती, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्या माध्यमातून निवेदन तसेच दूध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहचविण्यासाठी सोमवारी तहसीलदारांकडे देण्यात आले.

त्यानुसार कर्जतमध्येही भाजप शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन निवेदन आणि दूध दिले.

नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले. दुधाला 10 रुपये वाढीव भाव आणि दुधाच्या भुकटीला 50 रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे; तसे न झाल्यास 1 ऑगस्टपासून दूध बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी भाजप शिष्टमंडळाकडून देण्यात आला. 

या आंदोलनात किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष मंदार मेहेंदळे, किसान मोर्चाचे श्रीधर गांगल, शिवाजी पाटील तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर …

Leave a Reply