सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गुरव परिवाराला ‘लाख’मोलाची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोविड योद्धा म्हणून जबाबदारी बजावताना सुरेश गुरव यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत गुरव कुटुंबाला केली आहे. मदतीचा धनादेश परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून मनुष्यबळ कमी असल्याने पडेल ते काम करणारे पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई सुरेश गुरव या कोविड योद्ध्याची कोरोनाशी सुरू असलेली लढाई संपली. ते कोरोनाबाधित झाल्याने दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण रुग्णालयापासून ते उपजिल्हा रुग्णालय सुरू होईपर्यंत त्यांनी पनवेलमध्येच 15 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. शिपाई पदावर असूनही रुग्णसेवेसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने गुरव हे रुग्णसेवा देण्यासाठी हिरीरिने पुढे येत असत. पनवेलमधील साई नगर परिसरात ते कुटुंबासोबत राहत होते. 4 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर काही दिवस उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला.
सुरेश गुरव यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचा सामाजिक सेवेचा वसा कायम ठेवत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरव कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत करून नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपली आहे.