Breaking News

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सोनिया गांधी नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतेच एक वर्ष झाले. असे असले तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आता ‘लेटरबॉम्ब’ आला आहे.
आतापर्यंत राज्य पातळीवर काँग्रेसची नाराजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मांडली जात होती, पण या वेळी मात्र महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासाबद्दल मुद्दे उपस्थित केल्याचे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत खुद्द सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील लिहिले. या पत्राचा विषय राज्यातील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासाबाबत कार्यवाही करावी हा असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पत्र आणि दिल्लीतील पत्रकार परिषदेचा हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य पातळीवर सांगूनही काँग्रेसच्या नाराजीची दखल घेतली घेतली जात नसल्याने आता दिल्लीतील हायकमांडला यात लक्ष घालावे लागले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून तयारीदेखील सुरू केली आहे. तसे झाल्यास येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा कस लागणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा लेटरबॉम्ब पडला आहे. काँग्रेसच्या या मुद्द्यांचे निरसन होईल का? महाविकास आघाडीतील समन्वय चांगला होईल की अजून बिघडेल हे येत्या काळात स्पष्ट होईल, पण सध्या तरी महाविकास आघाडीत सध्या सगळे आलबेल नाही, असेच चित्र आहे.
किमान समान कार्यक्रमाची करून दिली आठवण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता सोनिया गांधी यांनीच पत्र लिहून सरकार तयार होत असताना बनवलेल्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत काँग्रेसमध्ये नाराजी आहे हे अप्रत्यक्ष दिसून येत आहे.
दोन दोन रिमोट कंट्रोल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा सर्वच पक्षांचे नेते मातोश्री निवासस्थानी पायधूळ झाडत असत. विशेष म्हणजे त्या वेळी बाळासाहेबांचा शब्द अंतिम मानला जात असे. आता काळ बदलला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मम् म्हणतात. हल्ली सरकारमधील निर्णय प्रक्रियेच्या बैठकाही ‘मातोश्री’बाहेर होतात. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याने सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांना त्यांचा शब्दही पाळावा लागणार आहे. म्हणजेच दुसरा रिमोट कंट्रोलही त्यांच्यावर सक्रिय झाला असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply