Breaking News

मयांक, विहारी ‘डेंजर झोन’मध्ये?

तिसर्‍या कसोटीत डच्चू मिळण्याची शक्यता

सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून, युवा खेळाडू शुबमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने संघातील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे डच्चू कोणाला मिळणार याबाबत औत्सुक्य आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका तूर्तास एक-एक अशी बरोबरीत असून, 7 जानेवारीपासून सिडनी येथे तिसर्‍या कसोटीला प्रारंभ होणार आहे. रोहित शर्मा संघात परतल्यामुळे एका फलंदाजाला डच्चू मिळणार हे जवळपास नक्की झाले आहे. हनुमा विहारी आणि मयांक अगरवाल यांची दोन सामन्यांतील कामगिरी पाहता दोघांपैकी एकाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन रोहितला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणार याबाबतही तितकेच औत्सुक्य आहे.
हनुमा विहारी दोन्ही कसोटी सामन्यांत सपशेल अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात विहारीला 16 आणि 8 धावा करता आल्या, तर दुसर्‍या कसोटीत तो 21 धावांवर बाद झाला. मयांक अगरवाललाही दोन्ही कसोटी सामन्यांत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. मयांकला दोन कसोटीतील चार डावांत फक्त 31 धावा करता आल्या आहेत.
मयांक आणि हनुमा विहारी यांच्यापैकी नेमका कोणाला डच्चू मिळणार याबाबत साशंकता आहे. क्रीडातज्ज्ञांच्या मते दोघांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन रोहित शर्मा आणि के. एल राहुल यांना संधी देण्याच्या विचारात आहे. रोहित आणि शुबमन गिल सलामीची भूमिका बजावतील, तर के. एल. राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गोलंदाजांमध्येही चुरस
पहिल्या कसोटीत अनुभवी मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर दुसर्‍या सामन्यात उमेश यादवही दुखापतीमुळे बाहेर पडला. शमी व यादव यांच्या जागी टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान मिळाले. आता भारतीय संघाकडे दुसर्‍या कसोटीत यशस्वी पदार्पण करणार्‍या सिराज व अनुभवी बुमराहच्या जोडीला तिसरा वेगवान गोलंदाज कोण, हा प्रश्न संघ व्यवस्थापनासह क्रीडा चाहत्यांना पडला आहे. नटराजन, शार्दुलबरोबरच नवदीप सैनीही तिसर्‍या वेगवान गोलंदाजाच्या शर्यतीत आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply