Breaking News

तोट्यातील एनएमएमटीला विद्युत बसचा आधार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पुढील काळात विद्युत बसचा मोठा आधार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या विद्युत वाहनांच्या धोरणामुळे (फेम योजनेअंतर्गत) वर्ष अखेरपर्यंत  230 विद्युत बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. यातील 30 बस सध्या सेवा देत असून त्या फायदेशीर ठरत आहेत. तर 30 बस या महिनाअखेर परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

पेट्रोल, डिझेल या पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र शासन बॅटरीचलित वाहनांसाठी प्राधान्य देत धोरण आखत आहे. यासाठीचा ‘फेम 1’ हा टप्पा संपला असून या अंतर्गत नवी मुंबई परिवहन उपक्रमासाठी 30 विद्युत बस अनुदानावर मिळाल्या आहेत. या बस सध्या प्रवासी सेवा देत असून त्या पारंपरिक इंधनावर चालणार्‍या बसपेक्षा फायदेशीर ठरत आहेत. सध्या केंद्राच्या ‘फेम 2’ योजनेला गती देण्यात आली असून त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात नवी मुंबई परिवहन उपक्रमाला 100 व दुसर्‍या टप्प्यात 100 बसचा प्रस्ताव आहे. ‘फेम 2’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 100 विद्युत बससाठी महापालिकेने रीतसर प्रस्ताव पास करून त्याबाबत ठेकेदार निश्चित करून कार्यादेश दिला आहे. त्यामुळे या महिन्यात यातील 30 बस तर पुढील काही महिन्यात 70 बस मिळणार आहेत.

सध्या सुरू असलेल्या 30 बस फायदेशीर ठरत असल्याने पालिकेने 100 बसच्या प्रस्तावाव्यतिरिक्त केंद्राकडे अतिरिक्त 100 बसेसची मागणी केली होती. त्यालाही केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे या 100 बस मिळण्यासाठी आता पालिका ठेकेदार निश्चिती करत असून ही प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे फेम 2 अंतर्गत परिवहन उपक्रमाला दोनशे विद्युत बस मिळणार असल्याने या वर्षअखेर शहरात 230 विद्युत बस धावतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अगोदरच नवी मुंबई परिवहन उपक्रम तोट्यात सुरू आहे. पालिकेच्या अनुदानावर त्याचे अवलंबित्व आहे. त्यातच कोरोनामुळे उपक्रमाच्या तोट्यात भर पडली आहे. परिवहन उपक्रमाचा तोटा चार कोटीवरून जवळजवळ 7.50 कोटीवर गेला आहे. यातून सावरण्यासाठी या विद्युत बसचा मोठा हातभार लागणार असल्याने याला प्राधान्य देत लवकरात लवकर या बस मिळविण्याचे नियोजन पालिका प्रशासन करीत आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात पालिका मालकीच्या 30 विद्युत बस कार्यरत असून ‘फेम 2’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 30 बस याच महिन्यात मिळणार आहेत. उर्वरित 70 बस पुढील काही महिन्यात मिळतील. तर आणखी 100 बसची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. या विद्युत बस शहरासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply