ब्रिस्बेन : वृत्तसंस्था
कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांची कठोर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) मंडळाला दिले, परंतु या घटनेच्या 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमधील नव्या टाळेबंदीने समस्या निर्माण केली आहे. शहरातील एका हॉटेलमधील कर्मचार्यास नव्या प्रकारचा कोरोना झाल्याने खबरदारी म्हणून ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय ब्रिस्बेनचा समावेश असलेल्या क्वीन्सलॅण्ड राज्यातही या पार्श्वभूमीवर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. ब्रिस्बेनच्या विलगीकरणाच्या नियमानुसार खेळाडूंना दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलमधील खोलीच्या बाहेर निघण्यासही मनाई आहे. नाइलाजास्तव ब्रिस्बेन येथे चौथ्या कसोटीचे आयोजन करणे अशक्य झाल्यास सिडनीलाच मालिकेतील अखेरची कसोटीही खेळवण्यात येईल, असे ‘सीए’ने यापूर्वी स्पष्ट केले आहे. 15 जानेवारीपासून चौथ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे.