Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे अधिवेशनात धरणे आंदोलन

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण; महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेल्या पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून धरणे आंदोलन केले.
कर्नाळा बँकेतील ठेवीदार व खातेदारांना ठेवींची रक्कम तातडीने परत मिळण्याबाबत आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, महेश बालदी, आशिष शेलार, समीर कुणावार, अमित साटम यांनी तारांकित प्रश्न दाखल करून याकडे शासनाचे लक्ष केंद्रित केले. या प्रश्नावर राज्याचे सहकारमंत्री श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तर दिले, मात्र राज्य सरकार या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप करीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून धरणे आंदोलन केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, रविशेठ पाटील, निरंजन डावखरे आदींनी येथे भेट देऊन या धरणे आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.  
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कर्नाळा बँकेतील खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी प्रयत्न करीत असताना महाविकास आघाडी सरकार मात्र निद्रिस्त आहे. या घोटाळ्याप्रकरणी 17 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा दाखल होऊनही आघाडी सरकार कोणतीही कारवाई करीत नाही. कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे अनेक खातेदार, ठेवीदार देशोधडीला लागले, तर कित्येकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तरीदेखील आघाडी सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई होऊन ठेवीदार, खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी गुरुवारी विधानसभेच्या पायर्‍यांवर आमदार महेश बालदी यांच्यासमवेत आंदोलन केले. या संदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार खाते व सीआयडी यांच्याशी संबंधित अधिकार्‍यांसह बैठक आयोजित करण्याचे मान्य केल्यामुळे धरणे आंदोलन स्थगित केले, परंतु खातेदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी पुढील काळातदेखील सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply