Breaking News

पवारांची टीम संपलीय : मुख्यमंत्री

काँग्रेसचे कल्याणराव काळे भाजपमध्ये

पंढरपूर : प्रतिनिधी

पवारांची टीम संपलीय. आता राज्य आमचे असून, आमचीच टीम काम करणार आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री पंढरपूर येथील सभेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

माढा मतदारसंघातील भाजप युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे बुधवारी (दि. 10) जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली. सोलापूर जिल्ह्यातील समाजकारणात असलेली सर्व माणसे आम्ही जोडली आहेत. दबावतंत्रावर खूप वर्षे तुम्ही चालवले, मात्र रावणराज जास्त काळ चालत नाही, रामराज्य येतच असते. कल्याणराव, तुमच्यावर कुणी दबाव टाकल्यास मला सांगा. रातोरात मी काय करायचे ते बघतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला. 

ओपनिंग बॅटसमन म्हणून कॅप्टन मैदानात उतरले, पण तेच पळून गेले असे म्हणत पवारांनी माढ्यातून घेतलेल्या माघारपणाची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली, तसेच पवारांची टीम संपली. आता राज्यात आमचीच टीम काम करणार असल्याचे म्हटले.

पश्चिम महाराष्ट्रातील माणसे ही स्वत:चा नाही, तर समाजाचा स्वार्थ घेऊन भाजपमध्ये येत आहेत. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा विरोधकांनी आमच्यावर प्रश्न उभे केले. सहकार, साखर कारखाने अन् शेतीतले यांना काय कळते, असे आम्हाला हिणवले होते, मात्र साखर कारखाने आणि शेतकर्‍यांना न्याय देण्याच काम आम्ही केले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आघाडीची वाट बिकट

काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काळेंसोबतच माजी नगराध्यक्ष दगडू घोडके, सुरेखा पवार यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. काळेंनी माढ्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 65 हजार मते घेतली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीपुढील अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व असलेली मोठमोठी घराणी आघाडीची साथ सोडत सत्ताधारी भाजपच्या गोटात दाखल होत आहेत. यापूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झाले, तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये आले. पुढच्या आठवड्याभरात खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे बडे नेते विजयसिंह मोहिते-पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एकूणच आघाडीची वाट बिकट असल्याचे दिसते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply