Breaking News

हैदरवाडीतील नागरिकांसाठी जलकुंभ उभारा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील हैदरवाडी (आदिवासीवाडी) येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग 5मधील हैदरवाडी येथील नागरिकांसाठी जलकुंभ उभारण्यात यावा, अशा मागणीचे पत्र नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले होते. त्या अनुषंगाने कार्यवाहीसाठी त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’मध्ये (खारघर)  सेक्टर-5 हैदरवाड़ी (आदिवासी वाडी) हा परिसर असून, या परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागास पाणीपुरवठा करण्यात अनेक मर्यादा येत आहेत. या वाडीमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त असून, या ठिकाणी पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना पाण्यावाचून वंचित राहावे लागते. नागरिकांना वेळेवर आणि मुबलक पाणी मिळत नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
हैदरवाडी पनवेल महापालिकेत सामाविष्ट झाल्याने पालिकेकडून पाणी समस्येवर कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या भागात पाण्याची साठवण करण्याकरिता 50 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची उभारणी केल्यास येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करता येऊन नागरिकांना वेळेत व मुबलक पाणी उपलब्ध होईल. त्याकरिता जलकुंभाची उभारणी करणे अत्यंत आवश्यक असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात यावेत, असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply