Monday , February 6 2023

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह उपनगर भागात शनिवारी (दि. 12) पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने आगमन केले आहे. ग्रामीण भागात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सुरू झाली आहे.  पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबईसह उपनगरात  पावसाची रिपरिप सुरूच असून मध्येच मुसळधार सरी बरसत आहेत. शिवाय, राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या सर्व परिसरामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या समोर रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही वाहन बंद पडत आहे तर काही वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागातदेखील रात्रीपासून पाऊस सुरू आहे. येत्या 48 तासात मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.  मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे. माहितीनुसार, आज आणि उद्यासाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वार्‍यांनी जोर पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज, उद्या आणि परवासाठी रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply