Breaking News

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांची मदत अंगणवाड्यांना वाटली

शेकापचा गंभीर आरोप

माणगाव ः प्रतिनिधी
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांना आलेली मदत माणगावमधील अंगणवाड्यांना वाटून एक करामत केली आहे. या गोष्टीचा मी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो, असा आरोप शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेस शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, जि. प. सदस्य आरती मोरे, मोर्बेचे माजी सरपंच दिनेश गुगळे, सुरवचे माजी सरपंच बळीराम खडतर, निनाद मोरे, योगेश मोरे आदी उपस्थित होते.
माणगाव तालुक्यातील 335 अंगणवाड्यांना शनिवारी (दि. 2) माणगाव कुणबी भवन येथे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी व वाटप करण्यात आलेले किट शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी ताब्यात घेऊन रविवारी आपल्या माणगाव येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. त्यांनी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने अंगणवाड्यांना वाटप केलेल्या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान पूरग्रस्तांसाठी मदत असे लेबल लावलेला पुरावा पत्रकारांना दाखवून प्रतिष्ठानवर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठविली. पत्रकार परिषदेत बोलताना मोरे पुढे म्हणाले रायगड जिल्ह्यात 22 व 23 जुलै रोजी जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन आपल्या शेजारील तालुके महाड व पोलादपूर या ठिकाणी महापूर येऊन तेथील लोकांचे अतोनात हाल झाले. यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना विविध पक्षांमार्फत तसेच संस्था, संघटनांकडून व दानशूर व्यक्तींकडून मदत येत होती. त्या वेळी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने आलेली ही मदत अर्धवट वाटून अनेक अन्नधान्याचे किट व साहित्य यांनी गोडावून भरून ठेवली आणि ही गोडाऊन आता उघडून तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षवाढीसाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

पालकमंत्री राजीनामा द्या!
राज्य सरकारच्या महाविकास आघाडीत शेकाप हा जरी एक घटक पक्ष असला तरी कोणी पक्ष चुकीच्या पद्धतीने वागत असेल ते शेकाप कधीच खपवून घेणार नाही. माणगावात पूरग्रस्तांसाठी आलेली मदत सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने साहित्याच्या रूपाने अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्द करून त्यांचाही एक प्रकारे अवमान केला. या साहित्याचे वाटप पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले असून पूरग्रस्तांच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याने त्यांनी आपला पालकमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी करीत याबाबत आपण मुख्यमंत्री व राज्यपाल यांचीही लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply