बलात्कार, विनयभंगाच्या घटना चिंताजनक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शहरात महिला अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. बलात्काराच्या घटना गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट घडल्या असून विनयभंग प्रकरणातही वाढ झाली आहे. महिला आता तक्रार करण्यास पुढे येत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
नवी मुंबईत व्हाइट कॉलर आणि सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्याची चर्चा नेहमीच असते, मात्र शंभर टक्के शिक्षित शहरात महिला अत्याचारांत झालेली वाढ ही शोभनीय नाही. 2020 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कालावधीत 96 बलात्काराचे गुन्हे नोंद झाले होते. तर 2021 मध्ये जानेवारी ते ओक्टोबर या केवळ दहा महिन्यांत 167 बलात्कारांच्या घटना घडल्या आहेत. सरासरी काढली तर महिन्याला सुमारे 15 बलात्काराच्या घटना शहरात घडत आहेत.
याशिवाय विनयभंग प्रकरणांतही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. 2020 या वर्षात 155 विनयभंगाचे गुन्हे नोंद होते. आता 2021 या वर्षात केवळ दहा महिन्यांत 160 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तर 2020 मध्ये 144 आणि 2021 मध्ये 156 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
बलात्कार गुन्ह्यांत बहुतांश घटना या परिचित व्यक्ती वा नातेवाईकांकडूनच घडल्या आहेत. शहरात वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटनाही घडली आहे. त्यामुळे महिलांनी अधिक सक्षम व सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.
गुन्हे वाढले याचे कारण अत्याचारांविरोधात महिला पुढे येत आहेत. महिला कुठेच सुरक्षित नसून बलात्कार करणारे अनेकदा नातेवाईक असतात. यासाठी महिलांनी स्वत: सक्षम होणे गरजेचे आहे. नवी मुंबईसारख्या शिक्षित शहरात या घटनांत वाढ होणे लाजिरवाणी बाब आहे.
-अमरजा चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या
महिला अत्याचारांबाबत पोलीस नेहमीच तत्काळ कारवाई करतात. जवळपास सर्वच गुन्हे उकल करण्यात यश आलेले आहे. अलीकडे महिलांमध्ये जागृती होत असल्याचे दसत असून महिला स्वत: होऊन धाडस करीत पोलीस ठाण्यात येत आहेत.
-सुरेश मेंगडे, उपायुक्त, गुन्हे शाखा
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
पनवेल : वार्ताहर
वाशीतील जुहूगावात राहणार्या एका 23 वर्षीय तरुणाने वाशी परिसरात रहाणार्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे. निलेश जाधव (वय 23) असे या तरुणाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याला विनयभंगासह बलात्कार व पोक्सो कलमाखाली अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी निलेश जाधव हा तरुण जुहूगावात तर पीडित मुलगी वाशी परिसरात रहाण्यास आहे. या दोघांची पुर्वीपासून तोंडओळख असल्याने आरोपी निलेश याने पीडित मुलीला फुस लावून तिच्यासोबत प्रेमसंबध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत मोबाइलवर चॅटींग करून तिच्यासोबत अधिक जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने पीडित मुलीला आपल्या घरामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना अथवा घरी आई-वडिलांना सांगू नये यासाठी त्याने पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी निलेश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper