Breaking News

नवी मुंबईत आता घरोघरी कोरोना प्रतिबंधक लसीकरण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्‍या डोसचे लसीकरण वेगाने व्हावे याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेने हर घर दस्तक अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत घरोघरी भेटी देऊन लसीकरण राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार  विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. नवी मुंबईत सद्यस्थितीत 58.25 टक्के नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले असून उर्वरित नागरिकांपर्यंत जलदरित्या पोहचून त्यांना संपूर्ण लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्र पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यामार्फत गृहभेटी दिल्या जात असून त्यांच्या लसीकरणाबाबतची स्थिती जाणून घेण्यात येत आहे. ज्या नागरिकांचा पहिला किंवा दुसरा डोस राहिलेला आहे अशा नागरिकांची माहिती संकलीत करून त्यांचे त्याच ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियमितपणे राबविल्या जाणार्‍या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या धर्तीवर कोविड लसीकरणाविषयीची माहिती घेऊन मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सुरू असलेल्या विविध भागातील 343 लसीकरण जागांवर नियमित लसीकरणाचे दिवस वगळून उर्वरीत दिवशी कोविड लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या सत्रांच्या दिवशी त्या भागामध्ये ध्वनीक्षेपकाव्दारे आवाहन करण्यात येत असून आशा स्वयंसेविका व एएनएम यांच्यामार्फत संकलीत यादीतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना लसीकरणासाठी पाचारण करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेची चार रुग्णालये, वाशी इएसआयएस रुग्णालय येथील जम्बो सेंटर, 23 नागरी आरोग्य केंद्रे, इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅट सेंट्रल मॉल सीवूड येथील ड्राईव्ह इन लसीकरण, दाणा मार्केट व एपीएमसी मार्केट, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनिट याठिकाणी नियमितपणे लसीकरण सुरु असून याशिवाय रुग्णवाहिकांमध्ये रुपांतरित केलेल्या 10 एनएमएमटी बसेसव्दारे मार्केट, डेपो अशा वर्दळीच्या ठिकाणी कोव्हीड लसीकरण केले जात आहे. यामध्ये आता हर घर दस्तक अभियान अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरणाला वेग दिला जात असून विहित वेळेत नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा याकरिता थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून प्रयत्न केले जात आहेत.

शासनाने सूचित केलेल्या हर घर दस्तक अभियानामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला अधिक वेग येईल व लवकरात लवकर दोन्ही डोस घेऊन नवी मुंबईकर नागरिक संरक्षित होतील.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

रेल्वेस्थानकांवरही विशेष केंद्र

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच कोरोना लसीकरणाचे सुयोग्य नियोजन करीत 101 पर्यंत लसीकरण केंद्र कार्यान्वित केली. या अनुषंगाने महापालिकेनेमोठ्या प्रमाणात वर्दळ असणार्‍या नेरुळ व वाशी या दोन रेल्वे स्टेशनवर विशेष लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. सकाळी 9 ते 5 या वेळेत ही लसीकरण केंद्रे कार्यरत असणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविताना कोरोना विषाणुची साखळी आहे तेथेच खंडीत करण्यासाठी टेस्टींगवर भर दिला असून महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन्सवर कोव्हीड टेस्टींग केंद्रे सुरू ठेवली आहेत. त्यामध्ये आता नागरिकांना संपूर्ण लस संरक्षित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून पहिल्या टप्प्यात नेरुळ व वाशी या दोन रेल्वे स्टेशनवर विशेष लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

लवकरच इतरही रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असून नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी अथवा कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस लगेच घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply