Breaking News

पनवेल महापालिकेचा केंद्रीय मंत्र्यांकडून सन्मान; स्वच्छताविषयक पुरस्कार प्रदान

पनवेल ः प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशभर स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार शनिवारी (दि. 20) राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नवी दिल्लीमधील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सवामध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक, उपायुक्त सचिन पवार, गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. पनवेल महापालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशात 27वा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत या वर्षी पनवेल महापालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आल्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणार्‍या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, शहरातील शौचालये शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर, सायकल रॅली, विविध टाकाऊ वस्तूंसाठी रिड्युस, रियुझ, रिसायकलचे स्वच्छतारथ महापालिकेने बनवले आहेत. महापालिकेच्या लोकप्रतिनीधी, अधिकारी, कर्मचारीवृंद व स्वच्छतामित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे पनवेल महापालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply