पोलादपूर ः प्रतिनिधी
पोलादपूर नगरपंचायतीच्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शिवसेनेने केवळ विकासाच्या बाता मारल्या असून आतादेखील कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या वल्गना केल्या जात आहेत. केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोलादपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी करून द्यायचा असेल, तर भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या, असे आवाहन राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व पोलादपूरचे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे केले. पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चा संघटक उज्ज्वला मराठे तथा माई शेठ यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रवीण दरेकर बोलत होते. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, राजेंद्र धुमाळ, प्रदेश सदस्य मनोज भागवत, तालुका अध्यक्ष तथा रायगड बँकेचे संचालक प्रसन्ना पालांडे, माई शेठ, संदीप ठोंबरे, कालिका अधिकारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पोलादपूर नगर पंचायत हद्दीत नळपाणी योजना, घनकचरा नियोजन, नानानानी पार्क, सुसज्ज वाचनालय, तरुणांना नोकरीची संधी, व्यापारासाठी विविध सुविधा असा सर्वंकष विकासाचा आराखडा आम्ही राबविणार आहोत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून देण्याची गरज आहे, असे आवाहन आमदार दरेकर यांनी केले. पोलादपूरकरांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावे. नगरपंचायतीचा कारभार स्वतः लक्ष घालून पाहीन. एखादा कमी सदस्य निवडून आल्यास अन्य पक्षाच्या चांगल्या सक्षम नगरसेवकांसोबत सत्तास्थापन करू, तसेच उर्वरित चार जागांसाठी निवडणूक लढवून यंदा भाजपची सत्ता आणू, असा विश्वास व्यक्त करतानाच मतदारांनी त्यांचे भाजप उमेदवारांना दिलेले मत तुमच्या लाडक्या प्रवीणभाऊलाच देत असल्याची खात्री बाळगावी, असे भावनिक आवाहन आमदार दरेकर यांनी केले. प्रदेश सदस्य मनोज भागवत यांनी पोलादपूरमध्ये अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली असताना ज्यांच्या घरात, दुकानांमध्ये चिखल झाला होता अशांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे जेवण कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव न करता देण्यात आले, मात्र त्यानंतर इतर पक्षीयांनी केलेल्या मदतवाटपामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना, तसेच समर्थकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची खंत व्यक्त केली.