पेण : प्रतिनिधी
उत्तर शहापाडा योजनेतील 27 गावे, 39 वाड्यांना पाणीपुरवठा करणार्या शहापाड़ा धरणाची पाणीपातळी खालावली असून जेमतेम 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सध्या धरणात मृत गाळयुक्त पाणी शिल्लक असून तेच पाणी पिण्यासाठी सोडले जाते. सध्या सर्दी, खोकला या आजारांनी नागरिक त्रस्त असताना गाळमिश्रित पाणी सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. 2021 वर्षाअखेरीस ही गंभीर बाब समोर आली असून, अनेक नागरिकांनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. पावसाळ्यात शहापाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुढचे सात महिने या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. 2021 वर्षाअखेरच धरणाची पाणीपातळी 17 मीटर असून, यामध्ये गाळयुक्त मृत पाणीपातळी 10 मीटर तर उर्वरित सात मीटर पाणीपातळीत गाळमिश्रित पाणी शिल्लक राहिले आहे. पुढचे 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, तेही गाळमिश्रित गढूळ पाणी जनतेला पिण्यासाठी सोडले जाते. त्यामुळे नव्या वर्षात पाणीटंचाईची समस्या सुरू होणार हे नक्की दिसत आहे. तरणखोप येथील जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित सिडको अधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. सिडकोच्या जलवाहिनीवरून लवकरच पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.
-आर. एम. राठोड, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पेण.
RamPrahar – The Panvel Daily Paper