जय भारतीय जनरल कामगार संघटनेची मध्यस्थी ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक करार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बाल्मर लॉरी आणि शेल इंडिया येथील कंत्राटी कामगारांच्या पगारवाढ व इतर सोयीसुविधांचा महत्त्वपूर्ण करार शनिवारी (दि. १) पार पडला. संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या करारामुळे कामगारांच्या वेतनात भरघोस वाढ झाली असून त्यांच्यामध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बाल्मर लॉरी येथील एल. आर. भोईर व एल. एन. भोईर यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीचा हा करार यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी सातत्याने सविस्तर पाठपुरावा केला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या करारानुसार कामगारांच्या एकूण पगारात तीन वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १० हजार २०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कामगारांना दोन लाख रुपयांची वैद्यकीय पॉलिसी आणि इतर अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.
या करारावर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, सचिव विनायक मुंबईकर, दीपक पाटील, जितेंद्र शेळके, बाळू खुटारकार आणि प्रमोद जोशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या, तर ठेकेदाराच्या बाजूने दिलीप भोईर व लहू भोईर यांनी सह्या करून करारावर शिक्कामोर्तब केले. यावेळी बाल्मर लॉरी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून एस. बी. कान्हेरे विशेष उपस्थित होते.
तसेच मल्हार एम्पोरियल प्रायव्हेट लिमिटेड (शेल इंडिया) येथील फोर्कलिफ्ट ऑपरेटर्सचा पगारवाढ व सोयीसुविधांचा करारदेखील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
शेल इंडियाच्या इतिहासात आजवर कंत्राटी कामगारांचा असा करार कधीही झाला नव्हता, मात्र जय भारतीय कामगार संघटनेने व्यवस्थापनाला हा करार करण्यास भाग पाडले. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही व्यवस्थापन आणि कामगारवर्ग यांच्यात उत्तम ताळमेळ घडवून आणण्याचे कौतुकास्पद कार्य जय भारतीय कामगार संघटना करीत असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले.
शेल इंडिया येथील या करारानुसार फोर्कलिफ्ट ऑपरेटरच्या पगारात १० हजार ५०० रुपयांची भरीव वाढ झाली आहे. तसेच कामगारांना दोन लाख रुपयांची वैद्यकीय पॉलिसी, कॅन्टीन, बोनस आणि सुट्ट्यांमध्ये वाढ या मागण्या मान्य करण्यात संघटनेला मोठे यश मिळाले आहे.
या करारावर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, सचिव विनायक मुंबईकर, रमेश पाटील, सोमनाथ सांगडे, ऋशाल मढवी, सोमनाथ दरे, सचिन पाटील, सुरज मढवी, सागर गोंधळी, दीपक माळी आणि मरिअप्पा हरिगोई यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तसेच ठेकेदाराच्या वतीने विनोद खानावकर आणि शेल इंडिया कंपनीच्या वतीने शशांक शेखर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper