Breaking News

मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाने मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर 1 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सीएसएमटीपासून कसारा, कर्जत, पनवेल तसेच पश्चिम रेल्वेमार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली.
उपनगरीय रेल्वेसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी असून, त्याद्वारे दररोज सुमारे 70-75 लाख प्रवासी प्रवास करतात. उपनगरीय रेल्वेसेवा बंद ठेवल्याने तसेच राज्य शासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. तथापि, गेले पाच महिने उपनगरीय रेल्वेसेवा बंद असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे रोजीरोटीचे व्यवहार पूर्णतः बंद होऊन त्यामुळे कोट्यवधी सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या हलाखीचे, उपासमारीचे जीवन जगत आहे हेही वास्तव आहे.
उपनगरीय सेवा दीर्घकाळ बंद राहिल्यास त्याचे कौटुंबिक व्यवस्थेवर सामाजिक व आर्थिक विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगून, उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करणे आवश्यक असल्याची कारणे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात नमूद केली आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवांसाठी सुरू असलेली उपनगरीय सेवा काही विशिष्ट स्थानकांवरच थांबतात. त्यामुळे या स्थानकांव्यतिरिक्त इतर स्थानकांवरील कामगारांना त्याचा काही उपयोग होत नाही. शिवाय अत्यावश्यक सेवेच्या गाड्या सकाळ, संध्याकाळी गजबजलेल्या असतात व दिवसातील इतर वेळी रिकाम्या धावतात. ज्या स्थानकांवर रेल्वेगाडी थांबत नाही ती स्थानके पूर्णतः बंद असून, त्यामुळे रेल्वेला कोणतेही उत्पन्न मिळत नाही, पण रेल्वेस्थानकाच्या सोयीसुविधांवर, रेल्वे कर्मचार्‍यांच्या वेतनावर खर्च होत आहे. पर्यायाने रेल्वेचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे अशा रेल्वेस्थानकाबाहेरील प्रवाशांवर अवलंबून असलेले व्यवसाय पूर्णतः बंद असून, या व्यवसायांवर रोजीरोटी अवलंबून असलेली कुटूंबही आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली आहेत. सीएसएमटी ते कर्जत, कसारा, पनवेल ही वाहतूक सुरू असली तरी ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. या मार्गावर ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्र, एपीएमसी मार्केट इतर अत्यावश्यक आस्थापना असून, त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कुर्लामार्गे प्रवास करावा लागतो. कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे ठाणे-बेलापूर पट्ट्यातील बहुतांश औद्यागिक आस्थापने अंशतःच सुरू आहेत, अशी रेल्वे सुरू करण्याची कारणे अधोरेखित केली आहेत.
सध्या मुंबई व परिसरातील कोरोना साथीच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असल्याने तसेच नमूद केलेली परिस्थिती विचारात घेता 1 सप्टेंबरपासून उपनगरीय सेवा सर्वसामान्यांसाठी साथीच्या दृष्टीने आवश्यक असलेली खबरदारी घेऊन नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply