माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी दोन दिवसांचा दौरा हाती घेतला आहे. फडणवीस हे विदर्भ-पुत्र असल्याने त्या भूमीशी त्यांचे घट्ट नाते आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे संकटकालीन परिस्थितीचा साकल्याने विचार करत तडफेने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी आहे. या सार्या गोष्टींना तूर्त तरी महाराष्ट्र मुकला आहे.
‘सुलतानाने नाडले आणि अस्मानाने झोडपले’ या म्हणीचे प्रत्यंतर सध्या अवघा महाराष्ट्र घेत आहे. देशभर आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना विषाणूचे थैमान थांबायला तयार नाही. रुग्णसंख्या आटोक्यात येण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतेच आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तर अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. ऑक्सिजनअभावी बुधवारी पुण्यामध्ये एका तरुण पत्रकाराला प्राणास मुकावे लागले. मोठा गाजावाजा करून पुण्यात उभ्या केलेल्या जंबो कोविड सेंटरची लक्तरे वेशीवर टांगली गेली. अशा भयंकर परिस्थितीतच निम्मा अधिक पश्चिम महाराष्ट्र महापुराच्या तडाख्यात सापडला. पूर्व विदर्भातील परिस्थिती तर पुराच्या पाण्यामुळे अतिशय गंभीर आहे. इतके होऊन देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले घर सोडून बाहेर पडायला तयार नाहीत. याला नेतृत्व म्हणायचे की आणखी काही, हे आता महाराष्ट्रातील मतदारांनी ठरवावे. या उलट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दोन दिवसांचा पूर्व विदर्भाचा दौरा हाती घेतला आहे. मौदा तालुक्यातील झुल्लर या गावापासून त्यांच्या दौर्याला सुरूवात झाली. या दौर्यात त्यांना जी विदारक परिस्थिती दिसली, ती अतिशय चिंताजनक आहे. या परिसरातील सोयाबीनचे पीक पूर्णत: नष्ट झाले आहे. गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. दवडीपार येथे तर घर-छप्परांचा मागमूस देखील उरलेला नाही. अनेक ठिकाणी घरांमधील संपूर्ण धान्यसाठा खराब झाला आहे. या अवघ्या परिसरात तात्काळ पंचनामे होण्याची गरज आहे. परंतु पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना ना कोणी वाली आहे, ना कुणी तारणहार. राज्य सरकारने त्यांना जणु वार्यावर सोडले आहे. सरकारी मदत सोडाच, एरव्ही सत्तेच्या खुर्च्या उबवणार्या मंत्री व नामदारांनी पूर्व विदर्भाकडे सहानुभूतीने बघण्याची तसदी देखील घेतलेली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आतातरी आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर येऊन पूरग्रस्त जनतेची विचारपूस करण्याची गरज आहे. निव्वळ कोरड्या घोषणा, ऑनलाइन बैठका आणि आश्वासनांच्या जोरावर परिस्थिती बदलता येत नसते. त्यासाठी लोकप्रतिनिधीने लोकांमध्ये मिसळणेच नितांत गरजेचे असते. नेमके हेच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री घरात बसलेला आणि विरोधीपक्ष नेता पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे जनताजनार्दनामध्ये मिसळतो आहे, त्यांचे अश्रु पुसण्याचा प्रयत्न करतो आहे हे चित्र राज्यकर्त्यांना निश्चितच लाजिरवाणे वाटले पाहिजे. कुठल्याही संकटात राज्यातील महाबिघाडी सरकार जनतेला कुठल्याही प्रकारचा आधार देऊ शकलेले नाही. मग ते कोरोनाचे संकट असो, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असोत किंवा पूर्व विदर्भातील भीषण पूरपरिस्थिती. या
नाकर्तेपणाचा जाब महाराष्ट्रातील जनता राज्यकर्त्यांना योग्य वेळी विचारेलच. मुख्यमंत्र्यांनीही वेळीच योग्य तो बोध घेऊन आपली निष्क्रियता सोडावी, अन्यथा ‘इकडे आड, तिकडे विहिर’ ही महाराष्ट्राच्या जनतेची अवस्था अशीच कायम राहील. असे घडले तर ते महाराष्ट्राचे खरोखरच दुर्दैव असेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper