आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरासह सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राला अखंडित वीजपुरवठा यापुढे होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील महिन्यात फिडर कार्यान्वित होईल, अशी माहिती एमजेपीच्या इलेक्ट्रिकल विभागाकडून सांगण्यात आले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.
पनवेल परिसराला एमजेपीकडून दररोज 80 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, कलंबोली, करंजाडे या परिसराचा समावेश आहे. पातळगंगा नदीतून वयाळ येथून पाणी उपसून ते भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. आणि तेथून पाणी पनवेल परिसरात आणले जाते. ही वाहिनी जीर्ण व जुनाट झाल्याने अगोदरच 40 चाळीस टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे सहाजिकच मागणीच्या तुलनेत पनवेल परिसराला कमी पाणी मिळते व पाणीटंचाईला रहिवाशांना सामोरे जावे लागते. त्यातच वारंवार शटडाऊन घेतला जात असल्याने पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळत आहे. विशेषकरून नवीन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे तत्कालीन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या संदर्भात मंत्रालयात बैठकाही घेण्यात आल्या. संबंधित जुनाट जलवाहिन्या बदलण्याबरोबरच भोकरपाडा जलशुद्धीकरण व पाणीउपसा केंद्रासाठी एमजेपीकडून स्वतंत्र एक्स्प्रेस वीज फिडर टाकण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार एमजेपीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली. प्रशासकीय आर्थिक मंजुरी ठेकेदार नियुक्त करण्यात आला. हे काम अगोदर होणे अपेक्षित होते, मात्र लॉकडाऊन त्यामध्ये आल्याचे इलेक्ट्रिकल विभागाकडून सांगण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार एक्स्प्रेस फिडर त्वरीत व्हावा याकरिता पनवेल मनपाचे नगरसेवक संतोष शेट्टी महाराष्ट्र एमजेपीच्या अधिकार्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी एमजेपी इलेक्ट्रिकल विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. के. सूर्यवंशी, उपअभियंता सुरेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर शेट्टी यांनीही शुक्रवारी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर काम करण्याची मागणी केली. 20 दिवसांच्या आत काम पूर्ण झाले नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष शेट्टी यांनी दिला आहे.
काम अंतिम टप्प्यात
भोकरपाडा आणि वयाळदरम्यान साडेसहा किमी अंतरावर वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. फक्त क्रॉसिंगचे काम राहिलेले आहे. महावितरण कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतर हे काम मार्गे लावण्यात येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून सांगण्यात आले. सध्या पाताळगंगा फिडरमधून वीजपुरवठा केला जात आहे. आता एक्स्प्रेस फिडरमधून वीज दिली जाणार आहे. यासाठी 3.81 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.