Breaking News

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा सोमवारपासून झंझावात; 16 ऑगस्टला ठाणे, 17 रोजी रायगड दौरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाचा कारभार लोकाभिमुख असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील 16 ते 20 ऑगस्टदरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात झंझावाती जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेत जिल्हास्तरीय व स्थानिक नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपमय होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदाचा बहूमान आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांना देण्यात आला. केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला 27 मंत्रिपदे मिळाली असून वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या ओबीसी व मागासवर्गीय समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. त्याला ठाणे जिल्ह्यासह कोकणातून नागरिकांची पसंती मिळत आहे. यानिमित्ताने जनआशीर्वाद घेण्यासाठी भाजपकडून यात्रा काढली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून ठाणे व रायगडमधील यात्रेचे नेतृत्व केले जाणार आहे. ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून 16 ऑगस्ट रोजी यात्रेला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून यात्रा जाणार आहे. दुसर्‍या दिवशी 17 ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल. तिसर्‍या दिवशी 18 ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागातून यात्रा जाईल. चौथ्या दिवशी 19 ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे, तर पाचव्या दिवशी 20 ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होणार आहे. जनआशीर्वाद यात्रेची जय्यत तयारी सुरू असून भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत विविध बैठका सुरू असून काटेकोरपणे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त समाजघटकांना जोडून घेत नागरिक व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

संवादासह विविध योजनांचा घेणार आढावा

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांची भेट, एमआयडीसीतील जमीन मालकांबरोबर बैठक, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, दिव्यांग लाभार्थींशी चर्चा, भाजपाचे समर्थ बूथ अभियान आदी कार्यक्रमांमध्येही मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत भाजप नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

तब्बल 451 किमी प्रवास, 173 कार्यक्रमांची रेलचेल

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून तब्बल 451 किमीचा प्रवास यात्रेद्वारे केला जाणार आहे. त्याचबरोबर विविध 173 कार्यक्रम होतील. याद्वारे दोन्ही जिल्ह्यांत भाजप पोहचत आहे. या यात्रेत ठाणे, रायगड, कल्याण, भिवंडी आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील भागाचा समावेश आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply