पेण : प्रतिनिधी
पोलीस असल्याच्या फायदा घेत विवाहित महिलेला धमकी देऊन तिच्यावर गेली सहा वर्षे शारीरिक अत्याचार करणार्या एका पोलीस कॉन्स्टेबलला पेण पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीने ड्युटीवर असणार्या पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. रायगड पोलीस दलाच्या अलिबाग मुख्यालयात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल शाम जाधव (रा. शिवाजी नगर, रामवाडी, पेण) याने पेण शहरातील विवाहितेला तिचा पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 2015पासून आजपर्यंत तब्बल सहा वर्षे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. अखेर या पीडित महिलेने शुक्रवारी (दि. 31) दिलेल्या तक्रारीनुसार पेण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379,(1) अ, ब, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शाम जाधवला अटक करण्यात आली. दरम्यान, पीडित महिला तक्रार देण्यासाठी गेली असता आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. तेथे ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उपनिरीक्षक यांना त्याने शिवीगाळ केली. या वेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांनादेखील त्याने शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शाम जाधव याला वैद्यकिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव यांनाही शिवीगाळ करून त्याने लाथेने मारहाण केली व पोलीस नाईक गुजराथी यांना मारहाण केली. या प्रकरणीही आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.