कर्जत : प्रतिनिधी
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. कर्जत नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
रविवारी आज पहाटे साडेचारच्या सुमारास कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला आग लागली. या घटनेची माहिती समजताच कर्जत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी संपल्याने आग विझविण्यात व्यत्यय आला. त्या दरम्यान खोपोली नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी आली, परंतु त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती सुरू होऊ शकली नाही. थोड्याच वेळात पाणी भरण्यासाठी गेलेली कर्जत नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी आली आणि जवानांनी आग विझविली.
कर्जत पोलीस उपनिरीक्षक सतिश शिंदे, हवालदार प्रविण लोखंडे, शिपाई गजानन केंद्रे, भरत पावरा, श्री कपालेश्वर मंदिराचे ट्रस्टी अभिजित मराठे, प्रशांत कारूळकर, महेंद्र बोडके, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे निलेश परदेशी, सदानंद जोशी, विवेक भागवत, अभिजित मराठे, निलेश परदेशी, बँकेचे माजी संचालक विलास थोरवे, संचालक राजेंद्र हजारे, कर्मचारी शाखाधिकारी संगीता भोईर, प्रमोद कुळकर्णी आणि अन्य कर्मचारी या ठिकाणी पोहचले.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, विवेक दांडेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या आगीत बँकेतील कागदपत्रे, संगणक, फर्निचर व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. खातेदारांची कोणत्याच प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून सोमवारपासून मारुती मंदिराच्या इमारतीमध्ये बँक सुरू करण्यात येईल, अशी माहिती बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे यांनी दिली.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper