Breaking News

पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे मनपाकडे हस्तांतरण करा

ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे आदेश

नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी नागपूर येथे संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.
पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे विनामोबदला करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन देऊन बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नागूपर येथे विधानभवनात ही बैठक मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, विभागाचे प्रधान सचिव, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, उपायुक्त गणेश शेट्ये यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महापालिका हद्दीत रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा असून या सर्व शाळांमध्ये महापालिका हद्दीतील हजारो गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेमार्फत या शाळांची दुरूस्तीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेली नसल्याने शाळेच्या इमारती सद्यस्थितीत खूपच धोकादायक व नादुरूस्त अवस्थेत आहेत तसेच सर्व शाळांची मालकी रायगड जिल्हा परिषदेकडे असल्यानेे पनवेल महापालिका या शाळांची दुरूस्ती तांत्रिकदृष्ट्या करू शकत नाही. शिक्षण घेणे हा मुलभूत अधिकार असल्याने या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता शाळांत उत्तम दर्जाचे शिक्षण व त्यांना लागणार्‍या सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे असून नादुरूस्त शाळा पनवेल महापालिकेकडे विनामोबदला हस्तांतरित केल्यास महापालिकेमार्फत या शाळांची दुरूस्ती किंवा नवीन वांधकाम करून उत्कृष्ट दर्जाच्या शाळा उभारून जिल्ह्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शाळेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे विनामोबदला करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून केली होती.
या संदर्भात झालेल्या बैठकीतील चर्चेत ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल महाालिका हद्दीत येणार्‍या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. या निर्णयामुळे शाळांना नवसंजीवनी मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण आणि गुणवत्ता विकासाला चालना मिळणार आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply