पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी सध्या सुरू आहे. त्या अंतर्गत रायगड केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन बुधवारी (दि. 26) भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेचे यंदा 12वे वर्ष आहे. नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ या स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत.
स्पर्धेत नवनवीन संकल्पना आणि दर्जेदार एकांकिका सादर होत असल्याने हा करंडक महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध झाला असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत स्पर्धेचा आवाका वाढला आहे. गेल्या 11 वर्षांत स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले असून ती नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
सीकेटी कॉलेज येथे होत असलेल्या रायगड केंद्राच्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटन समारंभास संस्कार भारतीचे अमित चव्हाण, प्रा. गीतिका तनवर, प्रा. आढाव, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप, अमोल खेर, आदित्य उपाध्ये, निखिल गोरे, कौस्तुभ सोमण, परीक्षक राजा अत्रे, व प्रमोद शेलार यांच्यासह कलाकार, रसिक उपस्थित होते.
दरम्यान, पुणे केंद्राची प्राथमिक फेरी 22 व 23 नोव्हेंबरला झाली. यातून रंगपंढरी पुणे यांच्या ‘बरड’, कलाकार मंडळी पुणेच्या ‘नाटेक’ आणि मॉडर्न कॉलेज, गणेश खिंडच्या ‘वामन आख्यान’ अशा तीन एकांकिकांची अंतिम फेरीमध्ये निवड झाली आहे.
यानंतर 28 नोव्हेंबरपासून मुंबई केंद्रांची प्राथमिक फेरी होणार असून महाअंतिम फेरी 5, 6 व 7 डिसेंबरला पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये, प्रमाणपत्र व मानाचा अटल करंडक तसेच कलाकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
Check Also
उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper