गोष्ट व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाची
तुम्हालाही माहित्येय आज आपण सोशल मिडियाच्या युगात जगतोय… एका क्लिकवर जगभरातील अनेक भाषेतील माहिती उपलब्ध होतेय आणि मनोरंजन होतेय…
एक साधं उदाहरण घ्या, पन्नास वर्षांपूर्वी घरात दूरध्वनी असणं हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई. आज हातोहाती मोबाईल फोन आहे. आज खरोखरच दुनिया मेरी मुठ्ठी मे आहे. मोबाईल म्हणजे चालते फिरते विश्वच…
हे का सांगतोय, तर पृथ्वीराज कपूर यांचा पणतू रणबीर कपूर याने आपण आपल्या कुटुंबियांचे चित्रपट निर्मितीचे बॅनर आर.के. फिल्म याचे पुनरुज्जीवन करीत असल्याचं सोशल मीडियात म्हटले आणि जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांना काही प्रश्न पडले. रणबीर कपूर पुन्हा आर.के. स्टुडिओची स्थापना करणार आहे का? तर अजिबात नाही. कारण चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अतिशय मानाचे स्थान प्राप्त केलेल्या चेंबूरच्या आर.के. स्टुडिओच्या जागेवर एक उंच प्रशस्त इमारत उभी राहिली आहे आणि बाहेर फक्त आणि फक्त आर.के. फिल्मचा सुपरिचित लोगो आहे.
आर.के. स्टुडिओचे पुनरुज्जीवन म्हणजे आर.के. फिल्म या बॅनरखाली चित्रपट निर्मिती करणार. आज चित्रपट निर्मितीत मोठ मोठ्या कार्पोरेट कंपन्या कार्यरत आहेत, भल्या मोठ्या बजेटचे चित्रपट ते निर्माण करत आहेत. आज आपण पॅन इंडिया चित्रपटाच्या युगात आहोत. एका भाषेतील चित्रपट अन्य प्रादेशिक भाषेत आणि हिंदीतही डब करून जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदर्शित करणे हा आजचा ट्रेण्ड आहे आणि या चित्रपटांना सबटायटल्स आहेत. रणबीर कपूर आता आर.के. फिल्मसाठी चित्रपट निर्मिती करेल तो असा असेल, तो कदाचित आर.के. फिल्मच्या परंपरेतील नसेल आणि ते आपल्याला स्वीकारावे लागेल. प्रश्न असा आहे की, रणबीर कपूरला यासाठी खरंच वेळ आहे का? दोन अतिशय मोठ्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात तो सध्या विलक्षण बिझी आहे. ते चित्रपट आहेत नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित लव्ह अॅण्ड वॉर. मल्टीप्लेक्समधील भव्य दिव्य दिमाखदार पडद्यावरच्या मनोरंजनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय याच कल्चरमधील हे चित्रपट आहेत. यातून वेळ मिळालाच तर रणबीर कपूरला आपल्या आर.के. फिल्मसाठी कथासूत्र, दिग्दर्शक निवडण्यापासून लक्ष देता येईल…
तुम्हालाही नक्कीच कल्पना असेल तब्बल सत्तावीस वर्ष झालीत, आर.के. फिल्म बॅनरखालील चित्रपट पडद्यावर आलेला नाही. म्हटलंत तर धक्कादायक. म्हटले तर त्यात नवल नाही, कारण चित्रपट आणि चित्रपटसृष्टी बरीच बदललीय.
भारतीय चित्रपटसृष्टीतील ’आर.के. फिल्मच्या चित्रपटांचे सातत्य, ग्लॅमर, महत्त्व, अस्तित्व, यशापयश, इतकेच नव्हे तर अगदी गॉसिप्स यांचा खूपच मोठा गौरवशाली इतिहास असल्याचे चित्रपट रसिकांना चांगलेच ज्ञात आहे’.
राज कपूरने अभिनेता, त्या अनुभवातून निर्माता व दिग्दर्शक आर. के. फिल्म बॅनरची स्थापना, ’आग’ (या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या वेळेस राज कपूरचे वय चोवीस होते हे विशेष. साल 1948) निर्मितीवस्थेत असतानाच चेंबूर येथे अतिशय देखणा व भव्य असा आर.के. स्टुडिओ उभारला. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन व संकलन यांचे सातत्य. मनोरंजनातून प्रबोधन हे वैशिष्ट्य. स्वत:चा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण होत गेला. राज कपूर दिग्दर्शित ’बरसात’ (1949), ‘आवारा’ (1951. हा चित्रपट त्या काळात बीबीसीवर दाखवला गेला), ‘श्री 420’ (1955), संगम (1964), ‘मेरा नाम जोकर’ (1970) (याच टप्प्यावर राज कपूरमधील ’कलाकार ’ मागे पडत जाऊन ’शोमन’ एस्टॅब्लिज होत गेला. नायिकेचे मन जाणून घेणारा आता तिचं शरीरसौंदर्यही दाखवू लागला हे चित्रपट जास्त दिसू लागले. राज कपूर बदलला. तो कलरफुल झाला.) ‘बॉबी’ (1973), ‘सत्यम शिवम सुंदरम’ (1978), प्रेम रोग (1982), ‘राम तेरी गंगा मैली‘ (1985) यांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्याचबरोबर ’आह’ (राजा नवाथे दिग्दर्शित 1953), ’बूट पॉलिश’ (दिग्दर्शक प्रकाश अरोरा 1953), शंभू मित्रा व अमित मोईत्रा दिग्दर्शित ’जागते रहो’ (1956), राधु कर्मकार दिग्दर्शित ’जिस देश मे गंगा बहती है’ (1960), रणधीर कपूर दिग्दर्शित ’कल आज और कल’ (1971), धरम करम (1976) आणि हीना (1991), राहुल रवैल दिग्दर्शित ’बीवी ओ बीवी’ (1982), राजीव कपूर दिग्दर्शित ’प्रेम ग्रंथ’ (1996) या चित्रपटांची निर्मिती आर.के. फिल्मने केली. यातील जवळपास प्रत्येक चित्रपटासाठी आर.के. स्टुडिओत भव्य दिव्य दिमाखदार सेट लागले. ते पडदाभर दिसले. (’आवारा’मधील स्वप्न दृश्याचा सेट गाजला),
दृश्य सौंदर्याचा त्यात प्रत्यय आला. आवारा चित्रपटाची रशिया व पूर्व युरोपमधील लोकप्रियता कायमच कौतुकाची गोष्ट ठरली. चीनचे क्रांती नेते माओ त्से तुंग यांना हा चित्रपट आवडे असे टाईम मासिकाने म्हटले. ‘श्री 420’मध्ये राज कपूरमध्ये चार्ली चॅप्लीनच्या छटा दिसल्या. ही यशस्वी चौफेर वाटचाल आ अब लौट चले या चित्रपटापर्यंत आली. चित्रपटाचे नाव ’जिस देश में गंगा बहती है’मधील लोकप्रिय गाण्याचा मुखडा. ऋषि कपूरने या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकले. तोपर्यंत अभिनेता म्हणून मोठीच वाटचाल होतीच. त्यात तो ’कपूर’. चित्रपट माध्यम व व्यवसायात सकारात्मक पाऊल टाकणारा (पण आपल्याच दिग्दर्शनातील चित्रपटातून भूमिका करणे मात्र टाळले). सुभाष घई दिग्दर्शित ‘ताल’ची अक्षय खन्ना व ऐश्वर्या राय अशी रोमॅन्टीक जोडी पुन्हा आ अब लौट चले या चित्रपटात जमली. राजेश खन्ना व मौशमी चटर्जी चरित्र भूमिकेत (अक्षय खन्नाचे पडद्यावर माता व पिता.) आहेत.
राजेश खन्ना आर.के. फिल्मच्या चित्रपटात ही जणू ब्रेकिंग न्यूजच. राज कपूर दिग्दर्शित ’सत्यम शिवम सुंदरम’ (1978)साठी राजेश खन्नाचीच नायक म्हणून निवड झाली होती. राजेश खन्नाचा तो ’पडता काळ’ असल्यानेच त्याला मोठ्या बॅनरचा हुकमी चित्रपट मिळावा म्हणून डिंपलनेच राज कपूरला विनंती केली हे गॉसिप्स फार गाजले आणि शम्मी कपूरच्या दबाबातून राजेश खन्नाला चित्रपटातून काढले. ही गोष्ट सहन न झाल्याने राजेश खन्नाने रागाच्या आपल्या आशीर्वाद बंगल्यातील काचेची वस्तू फोडल्याचे गॉसिप्स बराच काळ रंगले. असं सगळं असल्यानेच आता ’आ अब लौट चले’मध्ये राजेश खन्ना भूमिका साकारत होते हे विशेष. चित्रपट स्वीकारल्यावर राजेश खन्ना आर.के. कॉटेजमध्ये जाऊन रणधीर, ऋषि व राजीव या कपूरबंधुना भेटल्याचा फोटो चक्क एक्स्युझिव्हज ठरला.
चित्रपटाची स्टाईलीश आणि लक्षवेधक पूर्वप्रसिद्धी ही आर.के. फिल्मची खासियत याही चित्रपटाच्या वेळेस कायम राहिली. मला आठवतंय, आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी आर.के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रेस शो न करता मेन थिएटर मिनर्व्हात फर्स्ट डे फर्स्ट शोची पब्लिकसोबत चित्रपट पाहण्यासाठी तिकीटे दिली. (दिवस होता, 22 जानेवारी 1999) विशेष गोष्ट, चित्रपटाच्या मध्यंतरला शशी कपूर आम्हा चित्रपट समीक्षकांना भेटायला आला होता (आता तो शर्मिली, आ गले लग जा, त्रिशूल, चोर मचाये शोर या काळातील सडसडीत शशी कपूर राह्यला नव्हता हे सांगायलाच नको.) त्याला आमची मते जाणून घ्यायची होती. चित्रपट लॅव्हीश होता. खूप दिवसांनी राजेश खन्नाने अतिशय उत्तम अदाकारी साकारली होती. गीत संगीत (समीर व नदीम श्रवण) आर. के.च्या परंपरेला अजिबात साजेसे नव्हते. (ते अपेक्षितही नव्हते. राज कपूरचा गीत संगीताचा उच्च क्लास गाणी ऐकण्यात व पडदाभर पाहण्यात असे. कम्माल असे. त्या काळातील गाणी आजही लोकप्रिय. कधीही ऐकावीत आणि पहावीत. तोच मनसोक्त आनंद ).
‘आ अब लौट चले’ने साधारण स्वरूपाचे यश प्राप्त केले. आता प्रश्न होता आर. के. फिल्मचा पुढचा चित्रपट कोणता? दिग्दर्शक कोण असेल? कलाकार कोण असतील? बरेच दिवस झाले, महिने झाले, वर्षही सरली. आता तर चक्क सत्तावीस वर्ष पूर्ण झालीत, पण ही अतिशय प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्था कळत नकळतपणे इतिहासजमा झाली असेच म्हणायचे का?
मधल्या काळात दोन गोष्टी घडल्या. सप्टेंबर 2017मध्ये आर.के. स्टुडिओतील एका बाजूस आग लागली आणि चित्रपट शौकीन हळहळले. 2019 साली मात्र मोठाच धक्का बसला. ऋषि कपूरने म्हटलं, हृदयावर हात ठेवून आम्ही हा आर.के. स्टुडिओ बंद करून तो विक्रीचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आणि क्षणात आर.के.च्या चित्रपटांचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर आला. एक फार मोठी गौरवशाली ऐतिहासिक वास्तूच आता पाडली जाणार होती. नाईलाज व दुर्दैव. आज त्याच जागेवर एक चकाचक भव्य इमारत उभी असल्याचे दिसतेय. त्याचा पाया आर.के. फिल्म आणि अन्य चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग, प्रिव्ह्यू शो यांचा आहे. तेथे चित्रपट जगलाय, वाढलाय, रूजलाय. त्यावरची इमारत आधुनिक असेलही पण मूळ वास्तू कलेची सेवा व निर्मिती करणारी होती.
काहीही असलं तरी इतरत्र कार्यालय स्थापून आर.के. फिल्मच्या चित्रपटांची निर्मिती कायम ठेवता आली असती. करिश्मा कपूर, करिना कपूर, जावई सैफ अली खान पतौडी, रणबीर कपूर, सून आलिया भट्ट हे सेलिब्रिटीज ती यशस्वी कलरफुल परंपरा निश्चित कायम ठेवण्यात यशस्वी ठरले असते. तशी त्यांची आर्थिक क्षमता आणि लोकप्रियता नक्कीच आहे. इतिहासजमा होण्यापेक्षा इतिहास घडवत राह्यला हवे, पण तशी इच्छा हवी…
अशातच काही महिन्यांपूर्वी एक सुखद धक्का बसला आणि त्यानुसार रणबीर कपूर आर.के. फिल्म या बॅनरखाली चित्रपट निर्मिती नक्कीच करेल, पण तो चित्रपट (अथवा सातत्य ठेवण्याची सकारात्मक वृत्ती असेल तर ते चित्रपट) आर.के. बॅनरच्या परंपरेतील नक्कीच नसतील. यात काळाचा फरक आहे हे लक्षात घेऊन हे विधान करतोय. आज कथासूत्र एवढेसे आणि त्यावर व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर भरपूर अशा काळात आपण पोहचलोय, त्याचं प्रतिबिंब आर.के. फिल्मच्या आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसाठीच्या चित्रपटात असेल/दिसेल.
हे नवीन आर.के. फिल्म आहे.
- दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper