Breaking News

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ देत… त्यावरून सोशल मीडियात रिल पोस्ट होऊ देत… लगोलग एखादा नवीन ट्रेंड आलाच म्हणून समजा. चित्रपटाचं अख्खं जगच यशावर चालते, यशासाठी चालते, यशाच्या शोधात असते. येथे यश हाच जगण्याचा ऑक्सिजन आहे, जो सुपर हिट आहे, ते एकदम फिट्ट आहे, असा सरळ हिशेब. तीच फूटपट्टी.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर’ पहिला आणि तो सुपर डुपर हिट ठरला म्हणून दुसराही आला, तोच गाजला आणि यांनी उत्पन्नाचे केवढे तरी अफाट आणि अचाट विक्रमही केले. ही झाली कार्पोरेट भाषा. यातील पहिल्या भागात जास्त टर्न आणि ट्विस्ट होते आणि भरगच्च मनोरंजन आहे असे अनेकांचे मत आहे. दुसऱ्या भागात खचाखच जोरदार ॲक्शन दृश्य, रक्तपात, हिंसाचार, हिणकस शिव्या आहेत असेही अनेकांनी आपलं मत व्यक्त केले. या चित्रपटावर सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रांतून भरपूर उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. यावर मराठी चित्रपटसृष्टी गप्प का असाही एक मतप्रवाह आहे.
या सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते या चित्रपटासाठी रसिकांनी 229 मिनिटे (अधिक जाहिराती आणि ट्रेलरचा अर्धा तास) वेळ दिला. पहिला धुरंदरही 214 मिनिटांचा आहे आणि एकदा का रसिकांना चित्रपट आवडला की त्याची लांबी किती हा प्रश्न येतच नाही. ‌‘धुरंदर 2‌’चे तर अनेक शहरांतून चक्क दिवस रात्र खेळ चालले. रात्री अडीच वाजताचा या चित्रपटाचा खेळ असणं आणि त्यालाही हाऊसफुल्ल गर्दीचा प्रतिसाद असणं हे म्हणजे पूर्वीसारखी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्ससारखी
दिवसा तीन खेळ अशी चित्रपटाच्या खेळाच्या वेळेची हुकमी अट नाही. अर्थात, तो काळ वेगळा होता. काही चित्रपटगृहात दिवसा चार खेळ असत इतकेच. आता मल्टीप्लेक्स युगात ‌‘चित्रपटाची वेळ‌’ अमूकच असं काही समीकरण नाही. हादेखील एक रंजक बदलच. मोठा चित्रपट असेल, तर मल्टीप्लेक्समधील चार अथवा पाचही स्क्रीनवरचे जवळपास सगळेच खेळ त्याच चित्रपटाचे, असा मामला. चित्रपट प्रदर्शित करण्यातील ही नवीन संस्कृती आहे.
याच यशोगाथेत आता आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, आपला नवीन चित्रपट एकाच वेळेस दोन भागात आहे हे अगोदरच चित्रपट रसिकांना सांगून टाकावे आणि आपणही अशाच दोन लांबलचक, अधिक लांबलचक चित्रपटाच्या मेकिंगवर फोकस कायम ठेवणे. यात थीमचा विस्तारवाद करण्याचे स्वातंत्र्य.
दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी आपला महाखर्चिक चित्रपट ‌‘वाराणसी‌’ हा असाच दोन भागांत पडद्यावर आणण्याचे जाहीर केले आहे. याला ‌‘धुरंदर‌’च्या यशाचा प्रभाव म्हटले जाते. या चित्रपटाचं एकूण बजेट एक हजार कोटी रुपये आहे असे म्हटले जाते. चित्रपट निर्मितीत पैसा ओतायचा असतो, मोजायचा नसतो. भरभरून पेपरवर्क, पटकथा आणि संवाद लेखन, अधिकाधिक प्रभावी कला दिग्दर्शन, उच्च दर्जाचे छायाचित्रण, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर आणि कौशल्यपूर्ण संकलन या सगळ्यासाठी किमान दीडशे दोनशे जणांचे भलं मोठं युनिट, त्याचे नियोजन. या चित्रपटाचं सर्वच माध्यमातून जगभरातील प्रमोशन, मार्केटिंग आणि प्रदर्शन या सगळ्याचे मिळून हे घसघशीत आणि अमर्याद बजेट आहे. या चित्रपटात महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट हिंदीसह तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्येही डब करून प्रदर्शित होत आहे. पॅन इंडिया चित्रपट संस्कृतीनुसार हे सगळे आहे. सगळा मामला अफाट आणि अचाट आहे. आज मोठा चित्रपट म्हणजे असा प्रचंड मोठा फोकस असतो. ‌‘बाहुबली‌’ने (2014)यशस्वीपणे पेरले ते आता असं फोफावलंय, वाढलंय, विस्तारलंय, रुजलंय. दिग्दर्शक एस.एस. राजमोली यांचे म्हणणे आहे, ‌‘वाराणसी‌’ हा चित्रपट, त्याच्या विषयाची व्याप्ती तीन तासांत मांडता येणार नाही. ते अपुरे आणि अस्पष्ट ठरेल. या गोष्टीला अतिशय सविस्तर मांडायचे तर ‌‘वेळेची अजिबात मर्यादा नको.‌’ दिग्दर्शकाचं आपलं एक व्हिजन अधिकाधिक खुलत जाण्यासाठी संधी हवी. त्यावर काहीच मर्यादा नको. ‌‘येथे दिग्दर्शक दिसतोय‌’ असं कौतुकाने म्हणायचं का?
या ट्रेण्डचे श्रेय दिग्दर्शक अनुराग कश्यपला जाते. आपल्या चित्रपटाच्या विषयात आणि बोलण्यात कमालीचा सडेतोड आणि सुस्पष्ट. त्याने ‌‘गॅग्ज ऑफ वासेपूर‌’च्या (2012) वेळी अगोदरच म्हटलं, हा दोन भागातील चित्रपट आहे. त्यानुसार पहिला भाग (160 मिनिटे) पडद्यावर आल्यावर काही महिन्यांनी दुसरा भाग (159 मिनिटे) प्रदर्शित झाला. प्रचंड हिंसाचार असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला हे महत्त्वाचे. यात एक व्यावसायिक धोका असतो. समजा पहिला भाग रसिकांना आवडला नाही, चित्रपट फ्लॉप शो ठरला, तर दुसरा भाग कधी पाहतोय याची उत्सुकता संपून गेली तर त्यात आश्चर्य नाही. अनुराग कश्यपला आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटावर विश्वास असतो. तसा तो स्पष्टवक्ताही आहे.
एक चित्रपट, दोन भाग ही कॉन्सेप्ट जुन्या काळात असती तर? राज कपूरने आपल्या दिग्दर्शनातील आर.के. फिल्म या बॅनरचा पहिल्या रंगीत चित्रपट ‌‘संगम‌’ (1964) दोन मध्यंतरचा चित्रपट न करता दोन भागाचा केला असता आणि युरोपच्या सौंदर्यातील प्रेमाचा त्रिकोण आणखीन उत्कट प्रेम, गीत संगीताने खुलवला असता. राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्रकुमार या अधिकाधिक वाव मिळाला असता.
मग त्याला सुपर डुपर हिट यश मिळाल्याने ‌‘मेरा नाम जोकर‌’ (1970) दोन मध्यंतरचा चित्रपट म्हणून प्रदर्शित करण्याने दोन भाग आहेत असे चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत म्हणतच पडद्यावर आला असता. त्यात नायकाच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरील तीन असफल प्रेम प्रकरणे अधिकच रोचक आणि रंजक ठरली असती. गीत संगीताला आणखी वाव मिळाला असता. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत, त्यातील सौंदर्य पडद्यावर खुलवण्यासाठी अधिक संधी मिळाली असती. एक चित्रपट दोन भाग हे पूर्वी हवे होते हो, पण त्या काळातील चित्रपट रसिकांना ‌‘गोष्ट संपली, चित्रपट संपला‌’ असं पाहण्याची सवय आणि आवड होती. आजचा प्रेक्षक व्यावसायिक चौकटीतील नवीन रणनीती स्वीकारत आहे. चित्रपट बदलला, प्रेक्षकही बदलले.
आता, तुम्ही म्हणाल, चित्रपटांचे सिक्वेल अर्थात पुढचा भाग पडद्यावर येतोय, तेदेखील असंच काहीसं आहे ना? त्यात पहिला चित्रपट यशस्वी ठरल्यास दुसरा भाग अर्थात सिक्वेल, तोही यशस्वी ठरल्यास आणखी एक सिक्वेल असं आहे आणि अनेकदा तरी चित्रपटाचे मूळ नाव असते, पण त्यात ‌‘गोष्ट पुढे चालत नाही‌’. त्यात ब्रॅण्ड व्हॅल्यू महत्त्वाची असते. तोही ट्रेण्ड छान सेट झाला आहे.
चित्रपटसृष्टी बदलतेय, त्या बदलांचे स्वागत करायला हवे. त्यातील जे हवेसे वाटेल त्याला चित्रपट रसिक मनापासून स्वीकारतील, बाकीचे पडद्यावर ठेवून व्हॉटसअपवर लक्ष केंद्रित करतील…
चित्रपट एक भाग दोन हा ट्रेंड आता आणखी काही चित्रपटांच्या बाबतीत दिसेल हे नक्की आणि असे दोन भागातील चित्रपट काही वर्षांनी ओटीटीवर दहा भागांची वेबसिरीज म्हणूनही येतील. आजचे नियोजन हे उद्याचे व्यावसायिक रणनीती असते. आज चित्रपट उद्योग हा बराचसा कार्पोरेट क्षेत्रात एक महत्त्वाचा फंडा आहे, त्यामुळे त्याच्या रचनेत विक्री मूल्य जास्त महत्त्वाचे असेल तर त्यात आश्चर्य ते काय? चित्रपट म्हणजे माध्यम आणि व्यवसाय याची सांगड ही पारंपरिक व्याख्या झाली, आता चित्रपट म्हणजे कला, व्यावसायिक चातुर्य आणि विक्री मूल्य यांची अधिकाधिक सांगड असं आहे. एका नवीन वळणावर चित्रपट पोहचला आहे… त्यात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर आहेच, पण त्याचबरोबर एक चित्रपट दोन भाग असाही एक फंडा आहे.
गमतीत म्हटले जाते की, चित्रीकरण केलेले कोणतेही फुटेज वाया का घालवा? त्याचा सदुपयोग करून पैसा कमवूया या व्यावहारिक दृष्टिकोनातून हे घडत आहे. रमेश सिप्पीला हे सगळे फळले असतं हो. शोले, शान, शक्ती, सागर या चित्रपटाचं त्यांने केवढे तरी चित्रीकरण केले. अचूकतेच्या हव्यासापायी ते झाले आणि अधिकाधिक गोष्टी सांगण्यातून ते होत गेले. शोले चित्रपट एक भाग दोन हे त्याला सहज शक्य होते आणि त्याने ते अतिशय आवडीने केले असते.
एकीकडे ऑनलाईनच्या काळात म्हटले जाते की, काय ते थोडक्यात मांडा, एसएसएस करा आणि दुसरीकडे पहावे तर साडेतीन चार तासांचा चित्रपट पाहण्याची मानसिकता आहे.
अशा वेळी शंभर, सव्वाशे मिनिटांच्या चित्रपटांचे काय?

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

उलवे नोड येथील महोत्सवाचा शानदार समारोप

मंत्री आशिष शेलार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव उलवे नोड : रामप्रहर वृत्तमला …

Leave a Reply