पनवेल ः रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तसेच विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.४) विचुंबे येथे भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
विचुंबे येथील विठ्ठल-रखुमाई मैदानात रंगलेल्या या स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, प्राची जाधव, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, सदस्य नीलम भिंगारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव तसेच बळीराम पाटील, किशोर सुरते, अविनाश गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना प्रोत्साहन देत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील कबड्डी संघांना आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरपंच प्रमोद भिंगारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper