प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान होणार आहे. सरपंचपदासाठी 226; तर सदस्यपदासाठी एक हजार 631 असे एकूण एक हजार 857 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 25 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 11 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या; तर 9 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तेथील सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे, तसेच 79 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यांसाठी मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे.
भाजपचा वाढता जोर
जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांविरोधात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. विशेषतः पनवेल-उरण तालुक्यात भाजपचा जोर दिसून येतो. पनवेल तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित जागांसाठी लढत होत आहे. यामध्येही थेट सरपंच व उर्वरित सदस्यपदांच्या जागांवर भाजप मुसंडी मारेल, असे चित्र आहे. वावंजे ग्रामपंचायतीमध्ये भाजप-शिवसेना यांची युती असून, या युतीने विरोधकांसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे; तर उरण तालुक्यातील सोनारीतही भाजप युतीचा झंजावात पाहावयास मिळत आहे.
मतदान होणार्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
अलिबाग-आंबेपूर, आगरसुरे, कावीर, कुरकुंडी कोलटेंभी, कुर्डूस, कुसूंबळे, चरी, चिंचोटी, चौल, बामणगाव, बेलकडे, बेलोशी, बोरघर, सुडकोली, पोयनाड, ढवर, ताडवागळे, थळ, धोकवडे, रामराज, वरंडे, सारळ, शहापूर, श्रीगांव, सहाण; मुरूड-आंबोली, मजगाव, उसरोली; पेण-उंबर्डे, वढाव, शिहू, कांदळे, शिर्की; पनवेल-वावंजे, शिरवली; उरण-सोनारी; कर्जत-हालिवली, ममदापूर, पळसदरी, खांडपे, चिंचवली, किरवली, सावेळे; माणगाव-तळाशेत, साले, पेण तर्फे तळे, पाटणूस, निळज, साजे, रवाळजे, साळवे; तळा-उसर खुर्द, शेणवली; रोहा-संभे, किल्ला, सारसोली, पाटणसई, धाटाव; महाड-तेटघर, भावे, किंजळोली बुद्रूक, निजामपूर, आंबिवली बुद्रूक, आकले, कांबळे तर्फे महाड, विन्हेरे, वसाप, वलंग, दहीवड, वाळण बुद्रूक; श्रीवर्धन-वडघर, खुजारे, निगडी; म्हसळा-खामगाव, गोंडघर, खारगाव बुद्रूक.
RamPrahar – The Panvel Daily Paper