पेण : प्रतिनिधी
जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामवाडी येथील रायगड जिल्हा परिवहन विभागासाठी लवकरच 1200 नवीन गाड्या येणार असल्याने एसटीचा प्रवास भविष्यात वेगवान व सुखकर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पेण रामवाडी येथे केले.
पेण रामवाडी येथील विभागीय बसस्थानकाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 27) परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आगारातील वाहक, चालक व कर्मचारी यांच्याबरोबरच प्रवाशांच्या सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे ना. रावते यांनी सांगितले. परिवहन विभागात 35 हजार युवकांची भरती करण्यात आली असून तीन लाख बॅचेसचे आजपर्यंत वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे एसटीचे ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिदवाक्य भविष्यात पूर्णपणे सार्थकी लागेल, असा विश्वास ना. रावते यांनी या वेळी व्यक्त केला. एसटीच्या रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जि.प.सदस्य किशोरशेठ जैन, एसटीचे उपमहाव्यवस्थापक शैलेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, नगरसेवक दर्शन बाफना, अश्विनी कडू, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, पेण रामवाडी आगाराचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर ना. रावते यांच्या हस्ते अलिबाग एसटी आगाराच्या नियोजित बसस्थानकाचेही भूमिपूजन करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper