Breaking News

आमदार सुरेश लाड यांची निवडणूक रिंगणातून माघार?

कर्जत : प्रतिनिधी

कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांनी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. आर्थिक बाजू आणि काही भागात पक्षाचेच कार्यकर्ते आपली अडवणूक करीत असल्याचे त्यांनी मंगळवारी (दि. 1) तातडीच्या बैठकीत सांगून एकच खळबळ उडवून दिली. दरम्यान, आमदार लाड न लढल्यास सध्या शिवसेनेत असलेले सुरेश टोकरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन लढवावे, अशी मागणी बैठकीत काही कार्यकर्त्यांनी केली, मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे हे आमदार लाड यांनी लढावे यासाठी ठाम आहेत.

 आमदार सुरेश लाड यांनी कर्जत येथील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी तातडीची बैठक बोलावली होती. या वेळी त्यांनी आपल्याबाबत मतदारसंघात वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या असून, आपण दोन दिवस रुग्णालयात दाखल होतो. या कालावधीत कार्यकर्त्यांशी बोलू शकलो नाही. त्यामुळे आज संवाद साधत असल्याचे सांगितले. मी शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला भेटलो, कोण मला भेटायला आले, हे अपप्रचार करणार्‍यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान देऊन उगाच आपली बदनामी केली गेली असून, आपलेच काही भागातील कार्यकर्ते यात आघाडीवर असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आपण आठ दिवसांपासून खोपोली येथील कार्यकर्त्यांना बैठक लावायला सांगूनही ती आयोजित केली जात नाही. नेरळ येथील कार्यकर्ते बैठकीला येत नाहीत. यामुळे मी उद्विग्न झालो आहे, पण कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी निवडणूक लढवावी. यासाठी आपली मानसिकता तयार झाली आहे. निवडणुकीला किती आर्थिक तरतूद करून ठेवावी लागते हे सर्वांना माहीत आहे, मात्र तरतूद होत नसल्यानेदेखील मी ही निवडणूक लढवू शकत नाही, असे ते म्हणाले. या मतदारसंघात पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी आपण स्वतः उमेदवार असल्यासारखे काम करू, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply