Breaking News

मोदक बनविणार्या महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

पनवेल ः बातमीदार

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. घरोघरी बाप्पाच्या सेवेसाठी कामांची विभागणी झाली असून यात महिलावर्ग आघाडीवर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या नैवेद्याचा भार खांद्यावर घेत त्यासाठी त्यांनी पदर खोचला आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी रवा, बेसन, बुंदी आदी लाडूंची भाजणी सुरू झाली आहे. यात बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक दरवर्षीप्रमाणे यंदाही रेडिमेड खरेदी करण्यास अनेक महिलांनी पसंती दिली आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाली असून असे मोदक बनविणार्‍या महिलांना यातून आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग सापडला आहे.

सध्या कोरोनाच्या संकटामुळे मोदक विक्रेत्या गृहिणींनीही घरपोच सेवा देण्याला प्राधान्य दिले आहे. यात जवळच्या परिसरात मोफत सेवा दिली जात असून दूरच्या मागणीसाठी शुल्क आकारले जात आहे. गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरोघरी विविध पदार्थ केले जाणार आहेत. बाप्पाच्या आवडत्या उकडीच्या मोदकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही नैवेद्यांच्या ताटात मानाचे स्थान आहे. त्यासाठी काही महिलांनी रेडिमेड मोदकांची विक्री सुरू केली आहे. त्यांच्याकडे नोंदणीही सुरू झाली आहे.  याबाबत पनवेलमधील दीपाली आचार्य-डहाळे यांनी सांगितले की, मी तीन वर्षांपासून उकडीच्या मोदकांची विक्री करीत आहे. यंदा 23 रुपये नग असा दर आहे. थोडी मागणी घटली असली तरी नेहमीच्या ग्राहकांची नोंदणी कायम आहे. घरीच पीठ तयार करीत असल्याने व गुळाच्या योग्य वापरामुळे रसाळ सारण, पातळ सारी, नाजूक पाळ्यांमुळे उकडीच्या मोदकांबाबत ग्राहक समाधानी आहेत. सानपाडा, वाशी, पनवेल येथून नोंदणी सुरू झाली आहे. गणेशोत्सव काळात ती आणखी वाढेल.

खारघर येथील कोमल देवकुळे उकडीचे व तळणीचे अशा दोन्ही प्रकारच्या मोदकांची विक्री करतात. त्या गणेशपूजेचे एकत्रित साहित्यही पुरवतात. त्या म्हणाल्या की, मी मोदकांची चव वाढविण्यासाठी सारणात सुक्या मेव्याचा वापर करते. काहींना तळणीचे मोदक लागतात. ते खुसखुशीत करण्यासाठी त्यात गव्हाच्या पिठाबरोबरच मैदा, तुपाचा वापर करते. यंदा प्रथमच मोदकविक्री सुरू केल्याने व लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने एक नग मोदकासाठी 20 रुपये दर ठेवला आहे. खारघरबरोबरच पनवेल, नवी मुंबईतून हळूहळू मागणी वाढत आहे.

सुवासिक पिठाचीही विक्री

पनवेलमधील मानसी जोशी यांनी उकडीच्या मोदकासाठी सुवासिक तांदळाच्या पिठाची विक्री सुरू केली आहे. अनेक महिला पीठ विकत घेऊन घरीच मोदक बनवितात. त्यासाठी मानसी यांनी आंबेमोहर तांदळापासून पीठ बनवून त्याची विक्री सुरू केली. काही जणी नुसत्या तांदळाच्या पिठाची उकड काढतात. मी आंबेमोहर तांदळाचे पीठ तयार केले. यात चिकटपणासाठी इंद्रायणी तांदूळही घालते. त्यामुळे पीठ मऊ व सुवासिक होते. 160 रुपये किलोप्रमाणे पिठाची विक्री सुरू असून त्याला चांगली मागणी असल्याचे मानसी यांनी सांगितले.

तयार पुरणपोळ्यांनाही चांगला भाव

श्रावणात सोमवार, शुक्रवारी अनेक महिला पुरणपोळीचा खास नैवेद्य बनवितात. गौरी-गणपतीसाठीही पुरणपोळीचा बेत असतो. त्यामुळे तयार पुरणपोळीची विक्री सुरू केल्याचे पनवेलमधील स्वप्ना जोशी यांनी सांगितले. 25 रुपयास एक याप्रमाणे पुरणपोळीची विक्री सुरू आहे. एक दिवस आधी नोंदणी घेते. पोळ्या पातळ, सुरेख आणि त्यात पुरणाचे प्रमाण योग्य असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांकडून येत असून त्यामुळे उत्साह वाढल्याचे स्वप्ना यांनी सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply