खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या चौकजवळील एनडी स्टुडिओला आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र सेट जळून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
चौक-कर्जत रस्त्यावर एनडी स्टुडिओ असून, येथे फिल्मी दुनिया हे चित्रपट थिमवर आधारित पार्कही आहे. या ठिकाणी हिंदी आणि मराठी सिनेमांचे चित्रीकरण होते. त्यासाठी भव्यदिव्य सेट उभारण्यात आलेले आहेत. यातील जोधा-अकबरच्या सेटला शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास अचानकपणे आग लागली. हा सेट फायबर व लाकडाचा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे एकच धावाधाव झाली.
आगीची माहिती मिळताच खोपोली व कर्जत नगर परिषद तसेच रिलायन्स कंपनीच्या अग्निशमन दलांनी धाव घेतली. काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, मात्र या आगीत सेट जळून नुकसान झाले आहे. दरम्यान, खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते, चौक दूरक्षेत्र विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper