पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या विविध भागांमध्ये अंडरग्राऊंड कचराकुंडी तयार करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी निवेदनाद्वारे महापालिकेचे प्रभारी नगरसचिव यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ठिकठिकाणी कचरा कुंड्या उभारलेल्या असुन या कचरा कुंड्यांमधून दैनंदिन कचरा उचलण्याचे काम केले जाते, परंतु काही कारणास्तव कचरा उचलला गेला नाही तर तो कचरा त्या ठिकाणी तसाच पडुन राहतो व त्यामधील काही कचरा वार्याने इतरत्र पसरतो. त्यामुळे या भागाचे विदृपीकरण होते तसेच काही कचरा सडल्याने मोठी दुर्गधी निर्माण होते. त्यामुळे या समस्येवर बेळगाव महापालिकेद्वारे अंडरग्राऊंड कचरा कुंड्या उभारलेल्या असुन या कचरा कुंड्यामधून नियमीतपणे कचरा उचलला जातो. अशाच प्रकारच्या कचरा कुंड्या आपल्या महापालिकेच्या हद्दीत उभारल्यास शहराचे विद्रुपीकरण थांबण्यास मदत होणार आहे.पनवेल महापालिकेच्या विविध भागांमध्ये अंडरग्राऊंड कचरा कुंडी तयार करण्याबाबतचा विषय आगामी होणार्या महासभेमध्ये पटलावर घेऊन त्यावर विचारविनीमय करून पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.