पुणे ः प्रतिनिधी

राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास.योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम कामगार देश आणि राज्य निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन पंचवीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असून पाच वर्षात सर्वांना घरे देण्यासाठी कटीबद्ध आहे.
बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधीची कमी पडू दिला जाणार नाही. तसेच कामगारांना मध्यान्ह भोजन, आरोग्य आणि प्रशिक्षण देण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्या आहेत, कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतात कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधान सचिव राजेशकुमार मीना यांनी प्रास्ताविक केले. कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. शेती महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मीना, रेराचे अध्यक्ष गौतमकुमार चटर्जी आदी उपस्थित होते.
‘अडीच लाखाची शिष्यवृत्ती मिळाल्याने पी एच डी झालो’
कामगारांच्या मुलाला संशोधनासाठी अडीच लाखाची शिष्यवृत्ती उपलब्ध करुन दिल्यामुळे मी पी.एच.डी करु शकलो. मला शिष्यवृत्ती मिळाली नसती तर मी संशोधन करु शकलो नसतो असे सोलापूरच्या अनिल झेंडेने यावेळी सांगितले.ते म्हणाले, वंचित व गरीब मुलांसाठी अनेक योजना आहेत. कोणत्याही घटकातील मुलगा उच्च शिक्षण घेऊ शकतो, मात्र त्यासाठी शासनाचे पाठबळ हवे असते. कामगार विभागाने माझ्या गुणवत्तेची कदर करुन मला शिष्यवृत्ती दिली, त्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper